बारामती लोकसभेची निवडणूक सर्वात चर्चेची निवडणूक ठरणार आहे. बारामतीमधील पवार कुटुंबातील या लढतीकडे देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. बारामती हा पवार कुटुंबाकडे वर्षानुवर्ष राहिलेला मतदार संघ आहे. परंतु जुलै २०२३ नंतर समीकरण बदलले. बारामतीमध्ये पवार कुटुंबात फूट पडली. या फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीची वाट धरली तर शरद पवार महाविकास आघाडीबरोबर राहिले. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील या नेत्यांनी आपआपल्या घरातील उमेदवारास निवडणूक रिंगणात उतरवले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांनी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे विरोधात शड्ड ठोकले आहे. यामुळे या लढतीची चर्चा देशभर सुरु झाली होती. परंतु विदेशातही या लढतीचे कुतूहल दिसून आले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनीच माहिती दिली. ही निवडणूक कव्हर करण्यासाठी अमेरिकेहून प्रतिनिधी आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी बारामती लढतीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, बारामती मतदारसंघाची हवा संपूर्ण जगभरात आहे. मी जेवढा वेळ सदानंद सुळेबरोबर घालवीत नाही तेवढा वेळ बारामतीकरांबरोबर आनंदात घालवत आहे. देशभरातून पत्रकार बारामतीमध्ये येत आहेत. परंतु न्यूयॉर्कवरून देखील पत्रकार आले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे प्रतिनिधी बारामतीमध्ये तळ ठोकून आहे. त्यांच्यासोबत फोटोग्रॉफर्स आहे. म्हणजे शरद पवार हे जिल्हा, राज्य, देश नव्हे तर अमेरिकेपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हनुमान पावला आहे. त्यापेक्षा वेगळे काय हवे?
संपूर्ण मतदार संघात फिरावे लागत असल्यामुळे बारामती येथे कमी वेळ देते आहे. परंतु बारामतीकर ते सांभाळणार आहे. ग्रामपंचायतपासून लोकसभापर्यंत प्रत्येक निवडणूक वैचारिक लढाईने लढणार आहे. ही वैयक्तीक लढाई नाही.मी आणि अमोल कोल्हे एका विचाराने लढत आहोत.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे गेल्या तीन निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. यापूर्वी या मतदार संघावर शरद पवार निवडून येत होते. आता सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्यामार्फत घरातूनच आव्हान मिळाले आहे. या निवडणुकीत सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आहे. आपणास कुटुंबात एकटे पाडले जाईल, असा आरोप अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पाटील अजित पवार यांच्यावर टीका करत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरले आहेत.