लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहेत. पवार घराण्यातील लढतीमध्ये पवार कुटुंबातील वाकयुद्ध रंगले आहेत. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अजित पवार यांनी बुधवार चार दिवस सासूचे संपले, आता चार दिवस सुनेचे येऊ द्या, असे वक्तव्य केले होते. बारामतीमध्ये येऊन सुनेत्रा पवार यांना 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असाही जोरदार टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला होता. त्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. पवार यांच्या घरण्यातील कोणती सासू निवडणूक लढवली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पवारांच्या कुटुंबातील कोणत्या सासूने निवडणूक लढली. माझ्या आईला फोटो काढलेले ही आवडत नाही. माझी कोणती ही काकी अथवा आई (सासू) कधी राजकारणात आलेली नाही. आशा काकी, सुमिती काकी, भारती काकी आणि माझी आई अशी कोणतीही सासू राजकारणात आल्या नाही. या सर्व आपले खासगी जीवन जगल्या आहेत, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर दिले.
बारामतीमधील अनेक प्रश्न कायम आहे. मतदार संघात अनेक समस्या आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेली ३५ वर्षे आमदार कोण आहेत, १८ वर्षे पालकमंत्री कोण आहेत. तेव्हा आम्ही एकाच पक्षात होतो. ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यांनी विकास केला नाही. अजित पवार मतदान देण्याबाबत जे बोलले त्याबद्दल माझं एकच मत आहे. राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी.
शरद पवार बारामती लोकसभेत अडकून पडले, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे कोणी म्हटलं? शरद पवार यांचे रोजचे दौरे पाहा. त्यानंतर बोला. वास्तव काय आहे, आरोप करायचे आणि पळून जायचे. शेवटी आज कोण कुठं उभं आहे, हे पहा. मुळात ही निवडणूक शरद पवारांसाठी आहे की देशासाठी आहे. शरद पवार यांच्याशिवाय बातमी होत नाही. यामुळे त्यांना सर्वत्र शरद पवार दिसतात.
निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील नाती पुर्ववत होतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी कोणासोबतच नाती बिघडत नाहीत. माझी सर्वांशी नाती चांगली आहेत. राजकारणामुळं माझ्या नात्यासंबंधात परिणाम होत नाही. आता कश्मीर टू कन्याकुमारी जे कोणी निवडणूक लढतायेत, त्या प्रत्येक उमेदवाराला शुभेच्छा.
बारामती लोकसभेत मला तीन वेळा दिल्लीत पाठवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. आता चौथ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी मी अर्ज दाखल करत आहेत. जबाबदारी वाढलेली आहे. माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे. मी आत्तापर्यंत लोकसभेत जे बोलले ती भाषणं ऐका. मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत आले, यापुढे ही बोलत राहीन.