बिग बी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवाद असलेल्या दिवार चित्रपटाची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत करुन दिली. दिवार चित्रपटात शशी कपूर अमिताभला उत्तर देतो, ‘मेरे पास मां है’. तसेच उत्तर आज अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी कृतीतून आणि माध्यमांशी बोलताना आई आपल्यासोबत नसल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांची आई त्यांच्यासोबत होती अन् अजित पवार माझ्याकडे माझी आई आहे. तिचा मला आशीर्वाद आहे, असे रोखठोक सांगत सर्व विरोधकांना उत्तर दिले.
अजित पवार सर्व कुटुंबासह काटेवाडीत मतदानासाठी आले. यावेळी सुमित्रा पवार आणि अजित पवार त्यांच्या आईचे हात हातात घेऊन मतदान केंद्रावर आले. मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. सर्व पवार कुटुंब तुमच्या विरोधात आहेत. तुमची आईसुद्धा तुमच्यासोबत नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सांगितले की, पवार कुटुंब खूप मोठे आहे. आमच्या परिवारातील श्रीनाथ पवार, राजेंद्र पवार आणि साहेब (शरद पवार) ही लोकच विरोधात आहेत. इतर सर्व माझ्या सोबत आहेत. आता विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा कोण कुठे प्राचार करेल, हे तुम्हाला दिसेल.
विरोधक माझी आईसुद्धा माझ्यासोबत नाही, अशी अफवा पसरवत आहेत. परंतु माझ्या मातोश्री माझ्यासोबतच आहेत. त्या पुण्यात आमच्या नातेवाईकांचे लग्न होते. त्यासाठी गेल्या होत्या. त्यांनीच मला मतदानासाठी येण्याचे सांगितले. आता त्या मतदानासाठी माझ्या सोबत आल्या आहेत. आईचा मला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. कारण शेवटी ती माझी आई आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. काही जणांनी क्रिकेट बोर्डाकडे जायचे आहे म्हणून मुंबईत नावे केले. परंतु मी आमच्या गावातील काठेवाडीतील नाव कधीच कमी केली नाही. आता या निवडणुकीसाठी मी सर्वांना शुभेच्छा देत नाही. मी आमच्या उमेदवारास शुभेच्छा देत आहे. जो उमेदवार निवडून येईल, त्याला शुभेच्छा देत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.