लोकसभा निवडणुकीत राज्यातील ११ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या रात्री कुठे पैसे वाटप झाल्याचा आरोप केला जात आहे. धारशिव आणि बारामती लोकसभा मतदार संघात मध्यरात्रीपासून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी रात्रीच टि्वट केले. तसेच पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बँक सुरु असल्याचा आरोप केला. दरम्यान या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले. तो त्यांचाच माणूस असू शकतो. त्यांच्या माणसाला पाठवून ते असे करु शकतात, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
रोहित पवार यांनी रात्री पहिले ट्विट केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा. त्यानंतर रोहित पवार यांनी दुसरे ट्विट केले. बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस. यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय. यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसता आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…
यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत…
यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा? pic.twitter.com/TWZOOenx0V
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
सकाळी पुन्हा माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, किती पैसा वाटला तरी जनता आमच्या सोबत आहे. अडीच हजारांपासून पाच हजारांपर्यंत पैसे वाटप केले जात आहे. त्यासाठी बँक रात्री सुरु होती. आता ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
रोहित पवार आणि विरोधकांचा आरोपांना अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा, स्कॉड, सर्वच जण काम करत आहेत. अशा प्रकारांवर त्यांच्याकडून कारवाई केली जाते. विरोधकांकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. रात्री बँक उघडी असल्याचे म्हणतात, पण तुम्ही स्वत: बँक उघडी बघितली का? ते फोटो कधीचे आहेत? प्रत्येक बँकेबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असतात. ते तुम्ही चेक करु शकतात. आरोप करणाऱ्यावर व्यक्तीवर परिणाम झाला आहे. त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. उलट त्यांच्याच व्यक्तीला पैसे वाटण्यासाठी उभे करुन आमचे नाव घेतले जाऊ शकते, असे अजित पवार यांनी म्हटले.
धाराशिव लोकसभा मतदार संघातही पैसे व दारूच्या बाटल्या वाटल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांनी गाडी, दारू व पैसे जप्त केले आहेत. तसेच पंचनामा करत जबाब घेतले आहे. महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करण्यासाठी 500 रुपये व दारू वाटप झाल्याचा आरोप झाला आहे. भाजपचा खरोसा गावातील माजी सरपंच प्रशांत डोके व त्यांच्या चालक राहुल डोके यांच्यावर हे आरोप झाले आहेत. गावातील नागरिकांनी त्यांना पकडले मात्र त्यानंतर भितीने दोघे ही फरार झाले.