मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे लागू करावे, या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहेत. सोलापूरमधील बार्शीत मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू करण्यात आले आहे. खाली डोके वर पाय करत आंदोलन करण्यात येत आहे. आनंद काशीद या जरांगे समर्थकाने हे अनोखे आंदोलन सुरु केले आहे.
मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूरमधील बार्शीतील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाने आंदोलन सुरु केले आहे. खाली डोके वर पाय करत आंदोलन केले जात आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या आहेत त्याविषयी आमची कार्यवाही सुरू आहे. उपोषण सुरू होण्याआधीच मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. यामध्ये सरकारच्या वतीने मी उपोषणाचा मार्ग अवलंबू नका, असे सांगितले होते. हैदराबाद गॅझेट हा पहिला विषय होता. त्याच्या प्रति सर्टिफाय कॉपीज मागवलेल्या आहेत. मराठा आंदोलकांवरील जे गुन्हे मागे घेण्यासारखे आहेत, ते मागे घेतले गेले आहे. त्याबाबतचा अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडून सरकारकडे आलेले आहेत. याविषयी विधी आणि न्याय विभागाचा अंतिम अभिप्राय येणे बाकी आहे. तो देखील लवकरात लवकर मिळून जाईल. मुख्यमंत्र्यांचे या विषयावर संपूर्ण बारकाईने लक्ष आहे. ज्याप्रमाणे आश्वासन दिले आहेत त्या पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणतीही पूर्तता अपूर्ण राहू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
बच्चू कडू पाटील यांनी केंद्रातून दहा टक्के आरक्षण वाढीव मिळाले तर हा प्रश्न मिटेल असे म्हणतात. मात्र जे मागील काही दिवसांत आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी हे सर्व प्रश्न आहेत हे बोलण्याची गरज होती. आता याविषयी आम्ही बच्चू कडू यांच्याशी सविस्तर चर्चा करू, असे शंभूराज देसाई म्हणाले.