मुंबई | 20 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने कोविड काळात केलेला भ्रष्टाचाराचे अनेक दाखले देत विरोधकांची तोंडे बंद केली. तर फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षाची गुन्हेगारीची आकडेवारी सादर करत विरोधकांना निष्प्रभ केले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य हतबल झाले आहे. ही राम भूमी आहे. श्री रामाचा आदर आहेच. भारत राममय होणार. जणू राम पहिल्यांदाच अवतरणार आहे, असे वातावरण केले गेले आहे. तर, मग राज्यातील तमाम सीता माईंचे संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला होता.
विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना हा विषय सत्तारुढ पक्षाने मांडला. त्यामुळे आम्ही मांडला नाही. सभागृह संपलेलं नाही त्यामुळे विदर्भावर चर्चा होणार असे आम्ही गृहित धरुन आहोत. म्हणून आम्ही एक महिना अधिवेशन घ्या असे म्हणत होतो. आम्हालाही आणखी दिवस नागपूरची हवा घेऊ द्या असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्पष्टीकरण दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावाचा विषय कामकाज सल्लागार समितीमध्ये उपस्थित करायला हवा होता. त्यामुळे, इकडे वेगळे बोलायचे आणि बाहेर वेगळे बोलायचे हे धंदे बंद करा, असे त्यांनी खडसावले. तर, जयंत पाटील यांच्या दोघात बसून ठरवा की कुणी बोलायचं, बसून ठरवा”, या टोल्याला अजित पवार यांनी आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कसं कुणी बोलायचं ते आम्हाला कळतं असं ठणकावलं.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या या जुगलबंदी नंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. जयंतराव, राम नसते तर तुमचे तरी अस्तित्त्व राहिले असते का? तुमचा अवतार राजारामांमुळे अस्तित्त्वात आला. तुम्हाला तरी रामाचे अस्तित्त्व मान्य असले पाहिजे, असा खरमरीत टोला लगावला. फडणवीस यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच हंशा पिकला.
गृहमंत्री फडणवीस यांचे उत्तर संपले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्यास उभे राहिले. त्याचवेळी जयंत पाटील हे उभे राहिले. ते पाहून मुख्यमंत्री यांनी अहो! जयंतराव बसा, जयंतराव बसा, मजा येणार नाही असे म्हणत जयंत पाटील यांची फिरकी घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोविड काळात झालेल्या घोटाळ्यावरून ठाकरे पिता पुत्र यांचा एक फुल एक हाफ असा उल्लेख केला.