बीडः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लग्नाचा विधी, कन्यादानाविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एकिकडे पुण्यात ब्राह्मण महासंघाने या वक्तव्याचा जोरदार विरोध केला. नाशिकमधूनही प्रतिक्रिया आली तर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) ज्या गावचे आहेत, त्या परळीतील बालाजी धर्माधिकारी (Balaji Dharmadhikari) या कार्यकर्त्याचीही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. हिंदू धर्मात कधीही मम भार्या समर्पयामि असा मंत्र नसतो, आमदारकीसाठी मिटकरींना सापडलेले हे तंत्र असू शकते, अशा शब्दात या कार्यकर्त्याने अमोल मिटकरी यांची खिल्ली उडवली आहे. बालाजी धर्माधिकारी या कार्यकर्त्याच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून मिटकरींना या वक्तव्याबद्दल माफी मागावीच लागेल, असा सूर त्यातून उमटत आहे.
परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी नगराध्यक्ष आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते बालाजी धर्माधिकारी यांनी फेसबुकवर अमोल मिटकरींची खिल्ली उडवणारी पोस्ट टाकली आहे. हिंदू धर्मात मम भार्या समर्पयामि असा कोणताही मंत्री नसतो. मात्र मिटकरींना आमदारकीसाठी सापडलेलं हे तंत्र असू शकतं.. ही जाहीर खिल्ली आहे, अशी पोस्ट धर्माधिकारी यांनी टाकली आहे.
बालाजी धर्माधिकारी यांनी टाकलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे हे देखील खळखळून हसले. त्याचं काय कारण असा सवाल प्रतिक्रियांमधून विचारण्यात आला. त्यावर बालाजी धर्माधिकारी यांनी उत्तरही दिले आहे. या विषयात काहीजण धनंजय मुंडेंना विनाकारण ओढत आहेत. माझा त्यांच्या बाबतीतला अनुभव छान आहे. मी 22 वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय. ते ब्राह्मण द्वेष तर नक्कीच करत नाहीत. ते फक्त अमोल मिटकरी यांनी केलेल्या मिमिक्रीवर खळखळून हसले, अशी प्रतिक्रिया बालाजी धर्माधिकारी यांनी दिली आहे. तरीही मिटकरी यांनी माफी मागितलीच पाहिजे, असा सूर या प्रतिक्रियांतून उमटत आहे.
सांगली येथील इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सभेत अमोल मिटकरी यांनी कन्यादानाविषयी वक्तव्य केलं. विषय हनुमान चालीसा पठनाचा सुरु होता. मात्र मिटकरी यांनी हनुमान चालीसा म्हणता म्हणता इतरही श्लोक म्हटले आणि ब्राह्मण लग्न विधी आणि कन्यादानाबाबत वक्तव्य केलं. कन्या दान हा विधी कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी केला. त्यावर अनेक हिंदु संघटना आणि ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे.
@mnsadhikrut @RajThackeray वर टीका करताना अमोल मिटकरींनी एका दमात म्हटली हनुमान चालिसा @AmolMitkari @NCPspeaks #HanumanChalisa pic.twitter.com/HMc6E2hpyt
— Shivraj Yadav | शिवराज यादव ???️ (@shiva_shivraj) April 20, 2022
अमोल मिटकरी यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्यावरून पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महासंधाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर धडक देत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. अमोल मिटकरींविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनीही अमोल मिटकरींविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हिंदु धर्माची चेष्टा करणारे हे दुसरा तिसरा कोणी नसून राज्याच्या राजकारणातल्या शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी आहे. तर त्यावर निर्लज्जपणे दात काढणारे धर्म बुडवे मंत्री जयंत पाटील आणि 3-4 बायका सोडणारे मंत्री धनंजय मुंडे होते. हिंदूंची खिल्ली उडवणारे हे बांडगुळ पावसाळ्या आधीच उगवायला लागलेत. तेव्हा समस्त हिंदूं समाज या बांडगुळांना आणि शकूनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनीही या विषय़ावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अमोल मिटकरींचं हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक असून राष्ट्रवादीची ती भूमिका नाही. मी त्यांना विनंती देखील केलीय. बघुयात ते काय करतात. मला असं वाटतं कुठल्याही समाजाचा कुठल्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवलं नाही. आम्ही त्याच संदर्भात हसत होतो. असा संदर्भ कुठेही येत नाही. ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले. मिटकरी स्वतः स्पष्टीकरण देतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
इतर बातम्या-