बीड | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगलीनंतर परळी कोर्टानं (Parali Court) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांना 2008 साली अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. पोलिसांनी परळीतील सर्व घटनांचा तपास करून राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गु्न्हा दाखल केला होता. परळी न्यायालयात याविषयीचे दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी राज ठाकरे आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला असला तरीही न्यायालयातील खटल्याच्या तारखेला राज ठाकरे आणि कार्यकर्ते वारंवार गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता अजामीनपात्र वॉरंट बाजवण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टासमोर हजेरी लावणं अनिवार्य झालं आहे. पण 2008 साली राज ठाकरे यांना का अटक झाली होती, त्यावेळची स्थिती काय होती, हेही पहावं लागेल.
2008 मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे भरतीसाठी मुंबईत परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी देशभरातून उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. यात प्रामुख्याने उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्याचा दावा मनसेने केला होता. या परीक्षांमद्ये मराठी तरुणांना डावललं जात असल्याचा आरोपही मनसेने केला होता. हा वाद वाढल्यानंतर मनसेने 13 परीक्षा केंद्रांवर घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिलाय. 22 ऑक्टोबर 2008 ला राज ठाकरेंना मुंबई येथे अटक झाली होती. याचे पडसाद परळीत देखील उमटले होते. यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या, एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली होती. दगडफेकीत बसचे समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.ही घटना देशभरात पसरली आणि राज ठाकरे यांच्याविरोधात संताप व्यक्त होऊ लागला. राज ठाकरेंच्या अटकेची मागणी होऊ लागली. अखेर 22 ऑक्टोबर 2008 मध्ये राज ठाकरे यांना रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहातून अटक करण्यात आली. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. मनसे कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवले. बीड आणि सांगलीत या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं.
राज ठाकरेंच्या अटकेचे परळीत पडसाद उमटले. त्यामुळे राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चिथावणीखोर भाष्य केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. गु.रं.नं 217/2008अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश, परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे-पावडे यांनी दिला आहे.