महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? बीडमध्ये 24 तासात 2 अपहरणाच्या घटना; व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळली

| Updated on: Dec 10, 2024 | 6:51 PM

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरपंचाचा खून आणि व्यापाऱ्याचे अपहरण या दोन घटनांनी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी सर्व आरोपी अजूनही पकडले गेले नाहीत. या घटनांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? बीडमध्ये 24 तासात 2 अपहरणाच्या घटना; व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळली
महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? बीडमध्ये 24 तासात 2 अपहरणाच्या घटना; व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी
Follow us on

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंचाचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच एका व्यापाराचं अपहरण करून खंडणी मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात व्यापाऱ्याने खंडणीखोरांना पैसे देऊन आपली सुटका करून घेतली. यानंतर आज अखेर याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना आरोपी खंडणीखोरांना पकडण्यात यश येतं का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित प्रकरणामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अमोल दुबे यांची परळीत ऑल एजन्सी आहे. ते त्यांचे काम आटपून घरी जात असताना त्यांना पाच अनोळखी इसमांनी रसत्त्यात अडवलं. अज्ञात आरोपींनी अमोल दुबे यांना मारहाण केली. यानंतर आरोपींनी अमोल दुबे यांचं अपहरण केलं. या अपहरणा दरम्यान आरोपींनी दुबे यांच्याकडे 2 कोटींची मागणी केली. यावेळी अमोल दुबे यांनी विनंती करून 3 लाख 87 हजार रुपये रोख आणि 10 तोळे सोने देऊन आपली सुटका करून घेतली आहे.

संबंधित घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आज अमोल दुबे यांनी परळी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून दोन पथकांच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

हे सुद्धा वाचा

अपहरण आणि हत्येच्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला

महाराष्ट्र दोन दिवसांत अपहरण आणि हत्येच्या 2 घटनांमुळे हादरला आहे. पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं पहाटे अपहरण करण्यात आलं होतं. त्यांच्या अपहरणानंतर त्यांचा शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे त्यांच्या अपहरणाची घटना ही सीसीटीव्हीतही कैद झाली होती. पण संध्याकाळच्या सुमारास घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचंदेखील अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर अज्ञात आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करत मृतदेह फेकून दिला होता. या घटनेनंतर मस्साजोग गावचे गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी आज सकाळपासून बीड-लातूर मार्ग अडवला आहे. घटनास्थळी आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.