धनंजय मुंडे यांचं आता टेन्शन वाढणार, बबन गित्ते परळीत जायंट किलर ठरणार?

| Updated on: Aug 17, 2023 | 7:32 PM

Baban Gite Join NCP Chief Sharad Pawar Group | राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढील अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण त्यांच्या जवळच्या नेत्याने आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे या नेत्याने 700 गाड्यांच्या ताफा कार्यक्रमस्थळी आणत मोठं शक्तीप्रदर्शन केलं.

धनंजय मुंडे यांचं आता टेन्शन वाढणार, बबन गित्ते परळीत जायंट किलर ठरणार?
Follow us on

बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये आज जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचं वय झालंय, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार शरद पवारांनी घेतला. माझं वय झालं, असं तुम्ही म्हणता. मग माझं तुम्ही काय बघितलं? असा सवाल शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना केला. तसेच तुम्हाला सत्तेत जायचं असेल तर ठिक आहे. पण ज्यांकडून तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या आहेत, निदान त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवा, अशा शब्दांत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना सुनावलं.

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या सभेचा कार्यक्रम आयोजित केला होता. संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांची नक्कल करत जोरदार निशाणा साधला. त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार गटावर निशाणा साधला.

बबन गित्ते 700 गाड्यांचा ताफा घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल

या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ही घटना म्हणजे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या नेत्याने शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन गित्ते 700 गाड्यांचा ताफा घेऊन दाखल झाले होते.

बबन गित्ते यांनी आज जाहीरपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाषण केलं. “2019 मध्ये धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आणि ते मंत्री झाले. मला एवढंच सांगायचं आहे, साहेब पायगुण असतो. आपण मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला, 2024 मध्ये देशात आणि राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”, असं बबन गित्ते म्हणाले.

बबन गित्ते कोण आहेत?

बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं. गित्ते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला. गित्ते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. गितेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या आहेत. याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापतीदेखील होत्या. बबन गित्ते यांना मानणारा मोठा वर्ग परळी तालुक्यात आहे. त्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो.