बीड : बीडच्या बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपात (Illegal Abortion) प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अति रक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू (Death) झाला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाकडून छापेमारी (Raid) सुरू करण्यात आली असून पोलिसांनी गेवराईच्या महिला एजंटला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यावेळी मृत महिलेच्या पतीसह अन्य चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात चौकशी गठित करण्यात आली आहे. परळी येथील सुदाम मुंडे प्रकरणानंतर लिंगनिदान चाचणी करणारी मोठी टोळी उघड होण्याची शक्यता आहे. जालना, बुलढाणा जिल्ह्यात हे अवैध गर्भपाताचे जाळे असल्याचे एजंड महिलेने पोलीस तपासात सांगितले.
सीता गाडे या महिलेला तीन मुली आहेत. त्यानंतर आता ती चौथ्यांदा गरोदर होती. तिने या एजंट महिलेने गर्भलिंग निदान केंद्रात जाऊन चाचणी केली असता पोटात चौथीही मुलगी असल्याचे समजले. यानंतर महिलेचा पती, सासूस सासरे आणि भाऊ तिला सामान्य रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी घेऊन गेले. मात्र महिलेला चार महिने पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी गर्भपातास नकार दिला. यानंतर एका लॅब टेक्निशियनच्या ओळखीने महिलेला एका महिला डॉक्टरकडे नेण्यात आले. या डॉक्टरने महिलेला गर्भपाताची ट्रिटमेंट सुरु केली. या डॉक्टरने महिलेला गर्भपातासाठी काही गोळ्या दिल्या. त्यानंतर महिलेच्या गावातच त्यांच्या शेतातील गोठ्यात महिलेचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात केल्यानंतर गर्भ जाळूनही टाकला. मात्र यावेळी महिलेच्या गर्भाशयाला मोठी जखम झाली आणि महिलेला अति रक्तस्त्राव होऊ लागला.
रक्तस्त्राव होत असल्याने प्रथम महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी महिलेची अवस्था पाहून उपचारासाठी नकार देत जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला तपासले असता सर्व घटना उघड झाली. यादरम्यान दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरु केला असता हा सर्व भयानक प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी महिलेचा पती, सासूस सासरे आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौघांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी एजंट महिलेलाही ताब्यात घेतले.
अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एजंट महिलेच्या घरी धाड टाकली. यावेळी महिलेच्या घरी पोलिसांना गर्भपातासाठी लागणारे साहित्य आणि लाखो रुपयांची रोकड आतापर्यंत सापडली आहे. अजूनही पोलिसांची धाड सुरु आहे. महिलेचे बँक अकाऊंट तपासले जाणार आहेत. यानंतर ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. पोलीस उपधीक्षक संतोष वाळके हे तळ ठोकून आहेत. गेल्या 8 तासापासून पोलीस महिलेची चौकशी करत आहेत. मात्र अद्यापही महिलेने संबंधित गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचे नाव पोलिसांना सांगितले नाही. (Beed illegal abortion case likely to be a big racket, police action initiated)