बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याने जिल्हा ढवळून निघाला. या खूनाला 16 दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाटच आहेत. बीड पोलीसांवर अगोदरच आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. तर सीआयडी सुद्धा आरोपींचा माग काढण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहे. शनिवारी याविरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार सहभागी होणार असल्याची माहिती खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अजित पवार यांना खोचक टोला
बीडचा बिहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. बीडमध्ये अराजकता, दहशतीचे आणि गुंडागर्दी वाढली आहे. खंडणी वसूल करण्यात येत आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घडामोडीवर खासदार सोनवणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला. अजितदादांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, असे ते म्हणाले. अर्थात पालकमंत्री कुणीही व्हावं. कुणालाही करावं. पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.
शनिवारी बीडमध्ये मोर्चा
या सर्व घटनेत पोलीसांच्या निष्क्रियतेवर आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहे. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी याविषयीची माहिती दिली.
२८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात कोण सहभागी होणार माहीत नाही. अंजली दमानिया सहभागी होणार की नाही माहीत नाही. पण मी मात्र या मोर्चात सहभागी होणार आहे. खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. मी सहभागी होणार आहे, असे ते म्हणाले.
…तर 1 जानेवारी रोजी उपोषण
१ तारखेपासून तपास नाही लागला तर मी उपोषणाला बसेन. जोपर्यंत प्रकरणाचा छडा लागणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका सोनवणे यांनी जाहीर केली. त्यामुळे पोलीस यंत्रणेने या प्रकरणाच्या खोलात जावं. देवेंद्र फडणवीस हे कर्तव्यदक्ष आहेत. ते न्याय देतील अशी आशा आहे, असे ते म्हणाले.
१२०० लोकांकडे पिस्तूल
बीडचा बिहार करण्यास राजकारणी जबाबदार आहे. बीडमध्ये सर्वाधिक लोकांकडे रिव्हॉल्वर आहेत. या रिव्हॉल्वरसाठी शिफारस कुणी केली. त्याची चौकशी झाली पाहिजे. आम्हाला रिव्हॉल्वरची गरज लागत नाही. ज्यांना लागते त्यांना विचारा. १२०० लोकांनी रिव्हॉल्वर घेतली असं तुम्ही सांगता. पण त्यापेक्षा दुप्पट लोकांकडे रिव्हॉल्वर असतील. जेवढे गोळीबाराच्या घटनेत पकडले. त्यांच्याकडे रिव्हॉल्वरचं लायसन्स नव्हतं, असा आरोप खासदारांनी केला.
खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाच मागण्या
१) २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी कुणाला बोलावलं होतं, कुणी बोलावलं होतं ते तपासून काढा. खंडणीच्या गुन्ह्याच्या फिर्यादीत ते आलं आहे, त्याचा सखोल अभ्यास करा.
२) ६ डिसेंबर रोजी जी केस झाली, त्याचा सीडीआर काढा. त्यात अॅट्रोसिटी का घेतली नाही ते काढा
३) ९ तारखेला गुन्हा दाखल केला. किडनॅपिंगचा गुन्हा तीन तास लेट का केला त्याचा तपास करा. पोलिसांना कुणा कुणाचे फोन आले होते त्याचा सीडीआर काढा
४) पकडण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा. तुम्ही सीडीआर काढू शकता ना. त्यांचे मोबाईल टाका ट्रॅकला. सत्तेच्या जोरावर इलेक्शनमध्ये आमचे मोबाईल ट्रॅकवर टाकले होते. आरोपीचे सीडीआर का काढत नाही, असा सवाल त्यांनी केला.
५) मास्टरमाईंड कोण आहे, त्याचा शोध घ्या. याच आमच्या मागण्या आहेत. इथल्या पीएसआय, पीआयचे सीडीआर काढा. बीड जिल्ह्यात अनेक पीआय आहेत त्यांच्या बदल्या करा. ते सालगड्या सारखे वागले, त्यांना बदला. मटक्याचे धंदे बंद करा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, असा आरोप त्यांनी केला.