पुणे | 20 मार्च 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीडमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते आज शरद पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु होते. अखेर हे वृत्त खरं ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणे यांचं पक्षात स्वागत केलं. तर आपण आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी आपण तालुकाध्यक्ष होतो, असं बजरंग सोनवणे यावेळी म्हणाले.
“मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करतोय. तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मी प्रवेश करतोय. मी जास्त काही सांगणार नाही. पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तालुक्याध्यक्ष मी होतो. बऱ्याच जणांना ते माहिती नसेल. बरेचजण माझा इतिहास शोधताना मी भाजपमधून आलो असं म्हणतील. पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या विचारांबरोबर मी काम केलं”, असं बजरंग सोनवणे म्हणाले.
“माझ्या कार्यकर्त्यांनी आठ-दहा दिवसांपूर्वी बैठक घेतली. बऱ्याच दिवसांपासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण काम करावं. त्यांनी बैठक बोलावली पण त्या बैठकीला मी हजर नव्हतो. सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं राजकारणात जो सन्मान आपल्याला पाहिजे तो सन्मान मिळत नाही. या सन्मानाच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांची तळमळ होत होती. मला बीड जिल्ह्यातील 5 लाख पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलं. या नागरिकांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत येत आहे”, असं बजरंग सोनवणे म्हणाले.