चोरांमुळे झाले नदीपात्र स्वच्छ, बीडच्या करपरा नदीने घेतला मोकळा श्वास, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 26, 2024 | 8:36 PM

बीड शहरातील अंकुश नगर आणि नाथसृष्टी या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चोरांनी परिसरात आतापर्यंत चार घरफोड्या केल्या आहेत. पण या चोरांमुळेच परिसरातील करपरा नदीचं पात्र स्वच्छ झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

चोरांमुळे झाले नदीपात्र स्वच्छ, बीडच्या करपरा नदीने घेतला मोकळा श्वास, नेमकं काय घडलं?
चोरांमुळे झाले नदीपात्र स्वच्छ, बीडच्या करपरा नदीने घेतला मोकळा श्वास
Follow us on

सर्वसामान्य माणसं वेळ पडली तर काहीही करु शकतात, हे त्रिकालबाधित सत्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो. कधी कुटुंबात, कधी कामाच्या ठिकाणी, कधी प्रवासात, कधी रस्त्यावर, कधी इथे तर कधी तिथे असे नानाविध समस्या असतात. या समस्यांनी सर्वसामान्य नागरिक हे अक्षरश: वेढलेले आहेत. विशेष म्हणजे या सर्वसामान्य नागरिकांच्या सामाजिक समस्या सोडवण्याची जबाबदारी ही प्रशासन आणि सरकारची आहे, हे देखील तितकंच खरं आहे. पण सर्वसामान्यांसाठी वेळप्रसंगी प्रशासन आणि सरकार तातडीने धावून जाणं हे क्वचितच घडतं. गेल्या काही दिवसांपासून बीड शहरातील जनता चोरांमुळे प्रचंड त्रस्त होती. या चोरांनी अनेकांना लुबाडलं आहे. अनेकांच्या घरांमध्ये चोरी केली. घरफोडीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आले. या चोरांना करपरा नदीतील काटेरी झुडपे, पालापाचोळा आणि वेलींची चांगलीच साथ मिळत होती. नदीतील घाणीमुळे चोरांना लपण्यासाठी चांगलीच सोयीस्कर जागा मिळाली होती. विशेष म्हणजे याच चोरांमुळे आता नदीपात्र स्वच्छ झालं आहे. त्यामुळे बीडच्या करपरा नदीने मोकळा श्वास घेतला आहे.

नेमकं काय घडलं?

बीड शहरातील अंकुश नगर आणि नाथसृष्टी या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चोरांनी परिसरात आतापर्यंत चार घरफोड्या केल्या आहेत. हे शस्त्रधारी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या चोरट्ंयामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांमुळे त्रस्त नागरिक गस्त घालत रात्र जागून काढत आहेत. या दरम्यान हे चोरटे करपरा नदीपात्रात वेड्या बाभळी, काटेरी झुडपे आणि वेलींमुळे आडोशात दबा धरून लपून बसायचे, योग्य संधी मिळताच चोऱ्या करत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले.

स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाला पत्राद्वारे निवेदन दिलं. पण तरीही नदीपात्र स्वच्छ झाले नाही. नगरपालिकेच्या निदर्शनास आणून देवूनही पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे अखेर चोरांना हेरण्यासाठी नागरिकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. दरम्यान, नागरिकांनी संबंधित प्रकाराची पोलिसांनीदेखील माहिती दिली होती. पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जात होती. पण त्यामुळे नागरिकांची झोपमोड होण्याशिवाय दुसरं काहीच होत नव्हतं. पोलीसही या चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत होते. अखेर नागरिकांनीच त्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र येत मोठा निर्णय घेतला.

नागरिकांनी नेमकं काय केलं?

अखेर नागरिकांनी प्रत्येकी 200 रुपये वर्गणी गोळा करून तब्बल 1 किलोमीटरचे नदीपात्र पोकलेंडमशीन लावून स्वच्छ केले आहे. तसेच उर्वरित दीड किलोमीटरचा नदीपात्रचा परिसरही स्वच्छ केला जाणार आहे. त्यामुळे काट्याकूट्या आणि झाडाझुडपांनी वेढा घातलेली करपरा नदी मोकळा श्वास घेणार आहे. नदीपात्रात रात्री चोरटे लपून बसून चोरी करतात. त्यामुळे नदीपात्र स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचं नागरिक सांगत आहेत. चोरांच्या भीतीपोटी बीड शहरातील करपरा नदी पात्र नागरिकांनी स्वखर्चाने लोकवर्गणी गोळा करून स्वच्छ केले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे नाही तर चोरांचे आभार मानले आहेत.