बीड | जिल्ह्यातील केज-आडस रस्त्यावरील उमराईपासून दोन किमी अंतरावरील एका वसतीवर पोलिसांनी (Beed police) टाकलेल्या धाडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील परप्रांतिय वसतीवरील जडीबुटी विक्रेत्याकडे तब्बल साडे 13 लाख रुपयांची रक्कम आढळली. विशेष म्हणजे एवढ्या रकमेच्या नोटा पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत होत्या. गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी पहाटे पोलिसांनी (Police Raid) येथील वसतीला पहाटे चार वाजेच्या सुमारास वेढा टाकला. येथे राजस्थानातून आलेली अनेक कुटुंब राहतात. या वस्तीवरील सर्वांचा प्रमुख असलेला व जडीबुटी विक्रेता अर्जुन सोळुंके यांच्या घरात एका पोत्यात 13 लाख 21 हजार 320 रुपये आढळले. ही रक्कम पोलीसांनी जप्त केली असून गुन्हेगारीशी (Beed crime) याचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, धारूर येथील वसतीवरील काही लोक संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे पथक व धारूर पोलिसांच्या पथकातील 50 पेक्षा जास्त पोलीसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता उमराई वसतीला वेढा घातला. यात अर्जुन सोळंकेच्या पालात पोत्यात 13 लाख 21 हजार 320 रुपये आढळले. अंबाजोगाई तालुक्यातील केज आडस रोडवरील उमराईपासून पश्चिमेस दोन किमी अंतरावरील वस्तीवर काही लोक पालं ठोकून राहतात. यातील काही जण चटई विक्रीचा व्यवसाय करतात. येथे अर्जून हा प्रमुख आहे. जडीबुटीचा व्यवसाय करण्यास तो जवळच उभारलेल्या देवीच्या मंदिरात पुजारी म्हणूनही काम करतो. त्याच्याकडे सापडलेली रक्कम धारूर पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी तपास सुरु आहे.
ज्याच्याकडे 13 लाख रुपये आढळले, त्या अर्जुन सोळंके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला धारूर पोलीस ठाण्यात आणले आहे. त्याच्यासोबतच कुटुंबातील अन्य चौघांची चौकशी सुरु आहे. हा मुखिया जडीबुटीचा व्यवसाय करतो तर त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, एवढ्या दिवसांपासून यांच्यावर कुणाचा संशय कसा गेला नाही, असे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत.
इतर बातम्या-