बीड जिल्ह्यातील केज शहरात सध्याच्या घडीला मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला आज केज कोर्टात हजर करण्यात आलं. वाल्मिक कराडने आज सीआयडीच्या पुणे येथील कार्यालयात स्वत:ला सरेंडर केलं होतं. त्यानंतर सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेला रवाना झालं होतं. वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी व्हावी, अशी विनंती सीआयडीने कोर्टात केली होती. केज कोर्टाने सीआयडीची मागणी मान्य केली. त्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराड याला घेऊन आज रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास केज येथे दाखल झाले. केजमध्ये दाखल होताच सीआयडीचे पथक वाल्मिक कराड याला घेऊन केज येथील शासकीय रुग्णालयात गेले. तिथे वाल्मिक कराड याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराड याला केज पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
वाल्मिक कराडचे वकील हरिभाऊ गुठे आणि दूसरे वकील अशोक कवडे हे केज कोर्टात रात्री दहा वाजेआधी हजर झाले. तसेच सीआयडीतर्फे युक्तिवाद करण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे देखील केज कोर्टात हजर झाले. तर दुसरीकडे वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथे तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर वाल्मिक कराड याला केज कोर्टात हजर केलं जाईल. यानंतर सुनावणी पार पडेल, अशी माहिती आहे.
दरम्यान, एक महत्त्वाची घडामोड घडली. सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी कोर्टाकडे पत्र दिलं. वैयक्तिक कारणास्तव या प्रकरणात अन्य वकील नेमावा म्हणून पत्र दिलं. त्यामुळे आता जे बी शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करणार आहेत. आधीचे सरकारी वकील देशपांडे यांनी केस सोडली आहे.
या दरम्यान, केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही बाजूने परस्पर विरोधी कार्यकर्ते बघायला मिळाले. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पण तरीही कार्यकर्त्यांची पोलिसांसमोर घोषणाबाजी केली. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी केली. शिवाजी महाराज चौक न्यायालयापासून 500 मीटर अंतरावर आहे.
वाल्मिक कराड याला केज पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाताना केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतोष देशमुख यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी काही जणांनी केली. नही चलेंगे नही चलेंगे दादागिरी नही चलेंगी, अशी घोषणाबाजी करण्यात आली.