बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर फरार आरोप वाल्मिक कराड हा सीआयडीकडे सरेंडर झाला आहे. त्याने पुण्यात सीआयडी कार्यालयात जावून स्वत:ला सरेंडर केलं. यानंतर त्याला आता सीआयडीचे पथक बीडला घेऊन जात आहेत. बीडमध्ये केज कोर्टात वाल्मिक कराड याच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी होणार आहे. सीयआयडीकडून केज कोर्टात याबाबत शिफारस करण्यात आली होती. वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री कोर्टात सुनावणी व्हावी, अशी मागणी सीआयडीने केली होती. ती मागणी कोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे आता कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सीआयडीचं पथक कोणत्याही क्षणी केज कोर्टात दाखल होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणावर सुनावणी सुरु होऊ शकते. पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी केज कोर्टाच्या परिसरात दादागिरी सुरु केली आहे. याबाबतचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कोर्टातही दादागिरी सुरू केली आहे. कारडच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारातील गाड्या बाहेर काढण्यासाठी दादागिरी केली. त्यांनी कोर्ट कर्मचाऱ्यांना धमकी देत दादागिरी केली. “दहा मिनिटात गाड्या बाहेर नाही गेल्या तर मी माझा रिप्लाय देईन”, असं वाल्मिक कराडचा समर्थक म्हणाला आहे. कराडच्या समर्थकांनी केलेली ही दादागिरी चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडच्या रिमांडवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे 22 दिवसांपासून कराड कुठे फरार होता? तो इतक्या दिवसांनी का सरेंडर झाला? या प्रश्नांची उत्तरे आता त्याच्या चौकशीतून समोर येणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा दोषी असल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी वाद होऊन संतोष देशमुख यांची हत्या झाली तिथेच वाल्मिक कराड याने खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप कराड विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करु, असं आश्वासन दिलं आहे. पण प्रत्यक्षात अद्यापपर्यंत तरी मोक्का अंतर्गत गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल झालेला नाही, अशी चर्चा आहे.