बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडून बीडमध्ये धडाकेबाज पद्धतीने काम सुरु आहे. त्यांनी बीडमध्ये अवैध उद्योगधंद्यांविरोधात चांगलाच मोर्चा काढला आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. आमदार सुरेश धस यांनी आज एसपी नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यानंतर आता एसपी नवनीत कॉवत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “शस्त्रांच्या बाबतीत जेवढ्या जणांना शस्त्र बाळगण्याबाबत परवानगी दिली आहे त्या सर्व फाईल्सची चौकशी सुरु आहे. शस्त्र प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. याबाबत माझी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा झाली. शस्त्रांची गरज कितपत आहे या अनुषंगाने शस्त्रांचा परवाना राहू द्यायचा की नाही, शस्त्राची खरंच गरज आहे की नाही, याचं अॅनेलिसिस सध्या सुरु आहे. ज्या लोकांना गरज नाही त्यांचे परवाना रद्द होणार आहेत”, अशी महत्त्वाची माहिती एसपींनी दिली.
“शस्त्रांच्या सर्व फाईल्सचा तपास सुरु आहे. शस्त्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतो. पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेच्या हिशोबाने अॅनालिसिस करते. संबंधित व्यक्तीची पास्ट हिस्ट्रीचा हिशोबाने प्रत्येक फाईलची आम्ही अॅनालिसिस करणार. जिथे शस्त्राची गरज नाही तिथे आम्ही तशी शिफारस करणार”, अशी प्रतिक्रिया एसपी नवनीत कॉवत यांनी दिली.
“मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेस रिलीज काल जाहीर केली होती. सोशल मीडियावर बंदुकीसह व्हिडीओ किंवा फोटो शेअर करु नका, जेणेकरुन त्यामुळे दहशत निर्माण होईल, असं मी तरुणांना आवाहन केलं आहे. या प्रकरणी तीन-चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यांचे पिस्तूलीचे परवाने रद्द करण्याचा प्रस्तावही आम्ही पाठवला आहे. अशा प्रकारची कुठलीही पोस्ट टाकू नका. कारण पोलिसांपर्यंत ती पोस्ट पोहोचली तर कठोर कारवाई केली जाईल”, असं आवाहन नवनीत कॉवत यांनी केली.
यावेळी नवनीत कॉवत यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आलेल्या मेसेजबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अंजली दमानिया यांनी जेव्हा आम्हाला माहिती दिली होती त्याची आम्ही सखोल चौकशी केली. या तपासातून निष्पन्न झालं की, एका व्यक्तीने दारु पिवून त्यांना मेसेज पाठवला होता”, असं स्पष्टीकरण नवनीत कॉवत यांनी दिलं.
यावेळी नवनीत कॉवत यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “सध्या तपास सीआयडीकडून तपास सुरु आहे. सीआयडीला बीड पोलिसांची जेव्हा आणि जशी मदत लागते तशी मदत पोलिसांकडून दिली जाते”, अशी प्रतिक्रिया नवनीत कॉवत यांनी दिली.