बीडः पतीच्या सतत दारू पिण्यावरून पत्नीने कंटाळून गळफास घेतल्याची घटना (Suicide case) बीडमध्ये 23 नोव्हेंबर रोजी घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त करायला केल्याच्या आरोपाखाली वडील तुरुंगात गेले. आता या दाम्पत्याची दोन मुले आई-बापाच्या प्रेमाला पारखी झाली आहेत. बीड तालुक्यातील शिदोड येथील विवाहिता आत्महत्या प्रकरणातील हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा ठरतोय.
राजश्री रंजित कदम या विवाहितेने 23 नोव्हेंबर रोजी पतीच्या सततच्या वाईट वर्तणुकीमुळे आत्महत्या केली. तिने पत्र्याच्या आडूला स्कार्फच्या मदतीने गळफास घेतला. रंजितला दारूचे व्यसन होते. त्यासाठी तो नेहमी राजश्रीला मारहाण करत असे. 23 रोजी त्याने राजश्रीकडे दारूसाठी पैसे मागितले होते. तिने नकार दिल्याने त्याने राजश्रीला बेदम मारहाण केली होती. राजश्रीचे वडील जनार्दन चव्हाण यांच्या तक्रारीवरून रंजितविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
कदम दाम्पत्याला 13 आणि 10 वर्षांची दोन अपत्ये आहेत. सध्या आई आणि वडील दोघेही घरी नसल्याने या दोघांना शिदोड येथे आजी-आजोबांच्या आश्रयाला पाठवण्यात आले आहे. दारूपायी कदम दाम्पत्याच्या संसाराची अक्षरशः वाताहत झाली. या दोन चिमुकल्यांकडे पाहून नातेवाईकांचा जीव कासावीस होतो. बापाच्या चुकीची शिक्षा या निरागस लेकरांना भोगावी लागतेय, हे पाहून अनेकांचा कंठ दाटून येत आहे.
इतर बातम्या-