बीडः जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या नगर-बीड-परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गावरील सर्वात मोठा आणि लांब असलेल्या मेहेकरी नदीवरील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर अहमदनगर ते कडा या स्थानकांदरम्यान दोन डबे घेऊन एक रेल्वे पाठवण्यात आली. विशेष म्हणजे ही रेल्वे चाचणी यशस्वी झाली. आष्टीपर्यंत आलेली ही रेल्वे विविध गावांतील लोकांनी पाहिली. गावकरी मोठ्या कौतुकाने या रेल्वेच्या चर्चा करु लागले. लवकरच आता बीडपर्यंत रेल्वे धावण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने बीडकरांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
नगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 261 किमी रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र निधीच्या अभावी प्रकल्प कित्येक वर्षे रखडला. आता 27 वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. मागील दोन वर्षात नगर ते नारायण डोह आणि नागायण डोह ते सोलापूरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली. आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे. आता सोलापूरवाडी ते आष्टी या 32 किमी अंतराची चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेचे उप मुख्य अभियंता विजय कुमार रॉय यांनी दिली.
येत्या काही दिवसांमध्ये नगर ते आष्टी या 60 किलोमीटर मार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचीच पूर्वतायरी म्हणून गेल्या दहा दिवसांपासून रेल्वेचे इंजिन नगरहून आष्टीपर्यंत दररोज धावत आहे. हे इंजिन पाहण्यासाठी गावांमधील लोकांची गर्दी जमत आहे. लोक मोठ्या कौतुकाने रेल्वेची चर्चा करत आहेत.
इतर बातम्या-