अखेर व्हायरल होणारी ‘ती’ ऑडिओ क्लिप पंकजा मुंडे यांचीच? स्वत: पंकजाताई यांच्याकडून मोठा खुलासा

| Updated on: May 09, 2024 | 7:59 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे या एका अपक्ष उमेदवाराला अर्ज मागे घेण्याचं आवाहन केल्याचा दावा करण्यात येत होता. अखेर या ऑडिओ क्लिपवर आज पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे.

अखेर व्हायरल होणारी ती ऑडिओ क्लिप पंकजा मुंडे यांचीच? स्वत: पंकजाताई यांच्याकडून मोठा खुलासा
भाजप नेत्या पंकजा मुंडे
Follow us on

भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या रविकांत राठोड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता या कथित ऑडिओ क्लिपवर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “खरंतर अर्ज मागे घेण्याची तारीख माझ्या मते 26 एप्रिल होती. त्या दिवसाचं संभाषण नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर व्हायरल होतंय. त्यामुळे हे मला कळत नाही की हे काय आहे? त्या व्यक्तीचा आणि माझा काही परिचय नाही. ते राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना सांगितलं, की बाबा तू फॉर्म भरू नको कारण त्यांनी राष्ट्रवादीमधील नाराजीमुळे फॉर्म भरला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की, मला पंकजाताई स्वतः बोलल्या पाहिजेत. त्यामुळे मला धनंजय भाऊंचा स्वतः निरोप आला. म्हणून मी त्यांना बोलले”, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला.

“माझ्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर त्यांनी फोन लावून दिला, त्यांच्याशी मी जे बोलले ते जे संभाषण आहे, ते मी ऐकलं नाही. मात्र मला आत्मविश्वास आहे, तुम्ही हजार वेळा लावलं तरी त्यामध्ये काही अवैध, गैर आणि असंविधानिक नाही. ते मला काही त्यांच्या मागण्या ठेवत होते, पण ती क्लिप पूर्ण आहे की एडिट आहे? हे मला माहीत नाही. तेच म्हणाले माझ्या अवकातीत काय आहे? ते प्रयत्न करेन. आणि यामध्ये काही असंविधानिक नाही”, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला.

‘मी त्यांना समोरून फोन केला नाही’

“जर एखादा पक्षाचा कार्यकर्ता रुसून फॉर्म भरत असेल आणि त्याला त्याचे नेते सांगत असतील की फॉर्म काढ, तर ती त्यांच्यातील आपसातली चर्चा आहे. मात्र त्यांनी इच्छा व्यक्त केली, माझ्याशी बोलायची. मी त्यांना समोरून फोन केला, असं झालं नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली, माझ्याशी बोलायची आणि मी त्यांना बोलले आणि यामुळेच मला यामध्ये असं काहीच वाटत नाही की ते आक्षेपाहार्य आहे”, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. “महाराष्ट्रातील कोणत्याही गोष्टीची चर्चा थांबवायचे असेल तर पंकजा मुंडेंची बातमी करा, या ट्रेंडची मला सवय झाली आहे”, असंदेखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.