भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायबसे तरुणाने स्वत:ला संपवलं. या तरुणाच्या घरी आज पंकजा मुंडे गेल्या. त्यांनी वायबसे कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी पंकजा मुंडे या स्वत: भावूक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. पोपट यांच्या नातेवाईकांनी यावेळी हंबरडा फोडला. यावेळी पंकजा यांनी वायबसे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. पंकजा यांनी इतर कार्यकर्त्यांनादेखील असं कृत्य करु नका, असं आवाहन केलं.
“मी काही कारस्थानांना घाबरत नाही. हे कारस्थाने आपल्याला कळत नाही का? लोकं एक-एक लाखाने हारले. आपण थोडक्यात हरलो. हे आपल्याला कळत नाही का? माझ्याकडे हे भरुन काढण्याची संधी आहे. माझ्या लोकांनी जीव दिला तर मला असं वाटेल की, आपल्या आयुष्यात काहीतरी चुकलं. लोकं जीव देतील तर कसं जगायचं? तुम्ही मला एवढा जीव लावलाय की, मला एवढा जीव कुणीच लावला नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “मला बातम्यांसाठी हे काही करायचं नाही. हे काही न्यूज आणि क्रेडीचा विषय नाही”, असंदेखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. बीडमध्ये कोण जिंकेल? याबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राहिला. अखेर रात्री उशिरा निकाल समोर आला. पंकजा मुंडे यांचा खूप कमी मतांच्या फरकाने पराभव झाला.
पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे या गेल्या 10 वर्षांपासून बीड लोकसभा मतदारसंघात खासदार होत्या. तसेच पंकजा यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे भाजपचे बडे नेते होते. त्यांचं महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्यासाठी मोलाचं योगदान आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधननंतर पंकजा या महाराष्ट्राच्या राजकारणात अधिकृतपणे सक्रिय झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे हे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे पंकजा यांच्यावरही बीडमधील नागरिकांचं प्रेम आहे. असं असताना पंकजा यांचा पराभव होणं हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सहन झालेलं नाही. त्यामुळे पंकजा यांच्या दोन कार्यकर्त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.