बीड | 24 ऑक्टोबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगावमध्ये भगवान बाबा गडावरुन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात कारवाई करण्यात आली तेव्हा कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी दोन दिवसांत 11 कोटी रुपये जमा केले, असं सांगितलं. याबाबत विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या आपल्या मुलाला माहिती मिळाली. त्याने आपल्याला मम्मी तू ते पैसे घेशील का? असा प्रश्न विचारला. त्यावर पंकजा यांनी काय उत्तर दिलं, याबाबत पंकजा यांनी आज जाहीरपणे भाष्य केलं.
“माझ्या आयुष्यात मी एखाद्या निवडणुकीत पडली असेल तरी मी तुमच्या नजरेत पडली का? तुम्हाला लाज वाटेल, अपमान वाटेल, असं कृत्य मी केलं नाही म्हणून तुम्ही उन्हातान्हात येऊन बसता. इथे आलेला एका जातीचा माणूस नाही. धनगर समाज, माळी, मराठा, मुस्लिम समाजाचे बांधव आले आहेत. इथे शेती करणारे किती लोकं आहेत. तुम्हाला अनुदान मिळालं का? शेतमजुरी करणारे लोकं आहेत. शेतकऱ्याकडे मजुरी द्यायला काम आहे का? ऊसतोड मजूर आहेत. आता पैसा वाढवून दिलं पाहिजे की नाही? आता त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही. महाराष्ट्रात आज एवढे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर असताना, ओबीसींच्या मनात अनेक प्रश्न आहेत, या सरकारकडे जनतेला खूप अपेक्षा आहेत. अपेक्षाभंगाचं दु:ख आता कोणताही समाज भोगू शकत नाही”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या.
“शिवपरिक्रमा यात्रेत लोकांनी माझ्यावर जेसीबीच्या फुलांनी वर्षाव केला. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. मुंडे साहेबांना काम करत असताना त्यांना कधीच वाटलं नव्हतं की देशाचे मुख्यमंत्री होतील. त्यांनी कष्ट केलं. त्यांनी मला राजकारणात आणलं तेव्हा एकच गोष्ट सांगितली, पंकजा तुझ्या पदरात या राज्याची जनता टाकतो”, असं पंकजा म्हणाल्या.
“ज्यादिवशी तुम्ही 11 कोटी रुपये जमा करत होते त्यादिवशी माझ्या मुलाने मला फोन केला आणि सांगितलं, मम्मी हे एवढे पैसे यांनी जमा केले. मम्मी ते पैसे तू घेणार आहेस का? मी म्हटलं, मी एवढे पैसे घेणार नाही. पण त्या लोकांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही”, असं पंकजा यांनी सांगितलं.
“भगवान बाबांच्या साक्षीने मी सांगते. माझ्या मुलाला मी सांगितलं, मला वाटत होतं की, माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. मी त्यादिवशी माझ्या मुलाला सांगितलं की, बेटा तुझ्याआधी ही लोकं माझ्याजवळचे आहेत. जेवढा तू माझी जबाबदारी आहेस, त्याहून काकणभर जास्त हे माझी जबाबदारी आहेत. जेवढं प्रेम तू माझ्यावर आई म्हणून करतोस त्यापेक्षा जास्त प्रेम हे माझ्यावर करतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“तुम्ही का म्हणून माझ्यावर एवढं प्रेम करता? मला मिळालेलं शेवटचं मंत्रीपद सांगा. ग्रामीण विकास. तुमच्या गावागावात ग्रामपंचायत कार्यालय दिलंय की नाही? गावागावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली की नाही? जलसंधारणातून बंधारे केले की नाही? काम करताना तुम्हाला चपला झिझाव्या लागल्या का? बोलावून बोलावून सर्वांना दिलं. जेवढं मी परळीसाठी केलं तेवढंच पाथर्डीसाठी केलं”, असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.