बीड : मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पण त्यावर बोलताना भाजपचेच नेते विखे-पाटलांनी आरक्षण हवंच आहे. पण त्याचा भावनिक मुद्दा करु नका, असा सल्ला पंकजा मुंडेंना दिलाय. मात्र असं म्हणताना विखे पाटलांनी ईडब्लूएसमुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होत आहे, असंही विधान केलंय. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा परिधान करणार नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. मात्र राज्यात आणि केंद्रातही भाजपचंच सरकार असताना पंकजा मुंडेंचं हे विधान भाजप नेत्यांना रुचल्याचं दिसत नाहीय. मराठा आरक्षणावरुन भावनिक राजकारण न करण्याचा सल्ला भाजपचे नेते विखे-पाटलांनी पंकजा मुंडेंना दिलाय.
याआधी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी मराठा आरक्षणावरुन जे वादग्रस्त विधान केलं होतं, त्या विधानाला विखे-पाटलांनी दुर्देवी म्हटलेलं. मात्र तो वाद उद्भवल्यानंतर मंत्री तानाजी सावंतांनी 2024 पर्यंत टिकाऊ मराठा आरक्षण न मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.
मराठा आरक्षण न मिळाल्यास तानाजी सावंतांनी राजीनामा देण्याची तर आता पंकजा मुंडेंनी फेटा न परिधान करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे 2024 पर्यंत मराठा आरक्षण पुन्हा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, विनायक मेटेंच्या पहिल्या स्मृतीदिनाला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात एकत्र येण्याची चर्चा होती. मात्र नियोजित कार्यक्रम असल्यामुळे फार काळ थांबता आलं नाही, असं पंकजा मुंडेनी म्हटलंय. दुसरीकडे दुधानं तोंड पोळल्यानंतर आता ताकही फुंकून पिण्याची वेळ असल्याचं पंकजा मुंडेंनी भाषणात म्हटलंय आणि २०१९ मध्ये झालेला अपघात पुन्हा होणार नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवलाय.