बीडः भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज बीडमधील गोपीनाथ गड येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांना आवाहन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या, नेहमी गोपीनाथ गडावर सगळे नेते, कार्यकर्ते, समर्थक येतात. पण आता यापुढे गोपीनाथ गडावर तुम्ही यायची आवश्यकता नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी गरीबांच्या सेवा करण्याचा जो वारसा दिला आहे, तो आपण गावा-गावापर्यंत पोहोचवू. गरीबातला गरीब, फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत सेवेचा हा वारसा पोहोचवू. वीटभट्टीवरील कामगार, ऊसतोड कामगार, खडी फोडणाऱ्या सगळ्यांपर्यंत गोपीनाथ गड (Gopinath Gadh) गेला पाहिजे, असा संकल्प आज करू, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी जमलेल्या समर्थकांना केले.
पंकजा मुंडे यावेळी भाषणात म्हणाल्या, मी आजीला नेहमी विचारायचे, आजी मुंडेसाहेब जन्मले तो दिवस नेमका कसा होता. तेव्हा आजीने सांगितले, त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्या दिवशी गरीबाच्या घरी गरीबाचां काम करणारा राजा जन्मला. म्हणून तर आज लोक पोवाडे, भारूडाच्या माध्यमातून त्या राजाचं गुणगान करतात. त्यांचं कौतुक करताना लोकांनी माझं नाव घेतलं तेव्हा मला रहावलं नाही. हा दिवस माझा नाही. जनतेच्या सेवेसाठी आम्ही संकल्प केला आहे. देशातील सर्व नेते इथे आले की गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊनच जातात. कारण त्यांनी सगळ्या विचारांशी, जातींशी सलोखा निर्माण केला. त्यांचा हाच वसा पुढे चालवण्याचा दिवस आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात येण्यापूर्वी परळी येथईल वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर प्रवेश केला. इथे समर्थकांची मोठी गर्दी जमलेली होती. पंकजा यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महादेव जानकर, रत्नाकर गुट्टे, नमिता मुंदडा यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर आपण ऊसाच्या फडात जाणार असून तेथील ऊसतोड कामगार कशाप्रकारे काम करतात, कसे दिवसभर कष्ट करतात हे पाहणार, त्यांचे सुख-दुःख समजून घेणार असे नियोजन असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच आज रक्तदान करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
इतर बातम्या-