बीड | 3 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाला चार दिवसांपूर्वी बीडमध्ये हिंसक वळण लागलं होतं. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर हल्ला केला होता. प्रकाश सोळंके यांच्या गाड्या देखील जाळण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या बंगल्यावर आधी दगडफेक आणि नंतर जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेनंतर प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या घरावर हल्ला करणारे मराठा समाजाचे नसून बिगर मराठा समाजाचे समाजकंटक होते. राजकीय विरोधकांनी आपल्याविरोधात आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप प्रकाश सोळंके यांनी केलाय.
राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमाव चालून आला. त्यातील अडीचशे ते तिनशेच्या जमावाने सोळंकेंच्या घरावर चाल करून जोरदार दगडफेकीला सुरुवात केली. दगडफेकीत सोळंकेंच्या घराचं मोठं नुकसान झालं. त्यांच्या घराच्या काचा फुटल्या. घराखाली उभ्या असलेल्या चारचाकी गाड्याही हल्लेखोरांनी फोडल्या. महत्वाची बाब म्हणजे हा हल्ला होत असताना, डोक्यावर हेल्मेट, हातात काठी घेतलेले पोलीस हतबल होत केवळ बघ्याची भूमिका घेताना व्हिडीओतही दिसत आहे.
विशेष म्हणजे जमाव एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी सोळंकेंच्या घराखाली उभ्या असलेल्या चार ते पाच चारचाकी आणि 9 से 10 दुचाकी पेटवून दिल्या. ही घटना सकाळी 10.30 वाजता घडली. महत्वाची बाब म्हणजे हा हल्ला झाला त्यावेळी प्रकाश सोळंकेचं कुटुंब पुण्यात होतं. पण स्वतः आमदार प्रकाश सोळंके आपल्या घरातच होते. मात्र, सुदैवानं त्यांचे प्राण वाचले.
आमदार प्रकाश सोळंकेंचं घर पेटवल्यानंतर पावणे बारा वाजता जमावाने माजलगावचं नगर पंचायतीचं कार्यालयही पेटवून दिलं. दरम्यान, माजलगावमध्ये जो आगडोंब उसळला, सरकारी मालमत्तेसह सोळंकेंचं घर ज्याप्रमाणे जाळण्यात आलं त्यावरून हा राजकीय काटा काढण्याचा तर प्रयत्न नाही ना? असा प्रश्न विचारला जातोय. यावर प्रकाश यांनीही हा हल्ला पूर्ण प्लॅनिंग करून आणि मला जीवे मारण्याच्या हेतूनेच झाल्याचा दावा केलाय.
इतकंच नाही तर आपल्या घरावर हल्ला करण्याचा मला जीवे मारण्याचा कट कुठल्या लॉजवर, कुणाच्या शेतात शिजला? याची माहिती आपण सरकारला दिल्याचंही सोळंकेंनी म्हटलंय. तसंच हल्लेखोरांमधील 21 जणांची ओळख पटली असून त्यातील 8 जण बिगर मराठा असल्याचंही सोळंके यांनी सांगितलं. दरम्यान, ज्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे सोळकेंच्या घरावर हल्ला झाल्याचं बोललं जातं. त्यावर सोळंके यांनी आपण कोणत्या उद्देशानं त्यांना हुशार म्हणालो याचं स्पष्टीकरणही सोळंकेंनी दिलंय.