बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीची समिती स्थापन केली आहे. या समितीत 9 पोलीस अधिकारी आहेत. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत. सध्याचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हेही तपास पथकात असणार आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता आणखी वेगाने होतोय. राज्य सरकारने आरोपी वाल्मिक कराड याला पकडण्यासाठी त्याचे आर्थिकदृष्ट्या नाक आणि तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने त्याची संपत्ती जप्त केली. तसेच बँक खाते देखील गोठवले. यानंतर वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला. विशेष म्हणजे गेल्या 22 दिवसांत वाल्मिक कराड हा मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये फिरला. यानंतर तो महाराष्ट्रात पुण्यात आला. तो त्याच्या समर्थकांसह पुण्यात सीआयडी कार्यालयात सरेंडर होण्यासाठी काल दाखल झाला. त्याच्या समर्थकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अखेर सीआयडी तपासातून कराड हा तीन राज्ये फिरल्याची माहिती समोर आली.
वाल्मिक कराड याला केज कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीचे पथक घेत आहेत. वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर आता तो लवकर सापडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सीआयडीचे पथक सर्व कॉल रेकॉर्ड, सीडीआर युद्ध पातळीवर तपासत आहेत. आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी सीआयडीच्या पथकाने जंग जंग पछाडलं आहे. 100 पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.