बीड | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण प्रचंड तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये मराठा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर बंगल्याच्या दिशेला दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी बंगला परिसरातील गाडीला आग लावली. नंतर थेट बंगल्यालाच आग लावली. संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील समोर आलाय. विशेष म्हणजे मराठा कार्यकर्त्यांनी आज माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयातही जाळपोळ केली.
मराठा समाजाच्या तरुणांचा आज अचानक माजलगाव नगर परिषदेवर मोर्चा वळला. तरुणांनी हातात दगड घेत थेट नगरपरिषदेवर दगडफेक केली. त्यानंतर संतप्त जमावाने नगरपरिषदेला आग लावली. त्यामुळे नगरपरिषदेचं मोठा नुकसान झालंय. माजलगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पण या आंदोलनामुळे माजलगाव नगरपरिषदेच्या ऑफिसमध्ये फर्निचर, खुर्ची, टेबल, कॉम्प्युटर जळून खाक झालंय. तसेच मुख्याधिकाऱ्यांचं संपूर्ण ऑफिस जळून खाक झालंय.
मराठा कार्यकर्त्यांनी आज बीडमध्ये प्रचंड राडा केला. मराठा कार्यकर्त्यांनी माजलगाव नगर परिषदेत जाळपोळ केली. तसेच आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ केली. आंदोलक इथेच थांबले नाहीत. त्यांनी माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला देखील जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे.