मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज बीडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची बीडमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज ठाकरे बीडमध्ये ठरलेल्या हॉटेलजवळ आले तेव्हा धक्कादायक प्रकार बघायला आले. राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलबाहेर दाखल होताच गळ्यात भगवा गमछा घातलेल्या तरुणांनी जोरदार गोंधळ घातला. त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला. तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. सुरुवातीला संबंधित तरुण हे मराठा आंदोलक असल्याची माहिती समोर आली. यानंतर ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली.
आंदोलक तरुणांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या. यावेळी तिथे उपस्थित मनसे कार्यकर्ते देखील संतापले. त्यांनी या आंदोलकांचा प्रतिकार केला. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलक आणि मनसे कार्यकर्ते यांचा वाद सुरु झाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण या घटेनमुळे संबंधित परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.
राज ठाकरे बीडमध्ये हॉटेल बाहेर दाखल झाल्यानंतर त्यांचं मनसे कार्यकर्त्याकंडून जोरदार स्वागत करण्यात येत होतं. यावेळी काही जण आले. त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला. हा सर्व गोंधळ पाहून राज ठाकरे हे गाडीतून बाहेर आले. ते आंदोलकांशी बोलण्यासाठी गाडीतून बाहेर आले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मनसे कार्यकर्ते आणि आंदोलक आमनेसामने आले.
राज ठाकरे हे परभणीहून बीडमध्ये आले. ते स्वत: गाडी चालवून बीडमध्ये दाखल झाले. ते ठरलेल्या हॉटेलमध्ये आले तेव्हा काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीसमोर निदर्शने दिली. त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर बॅनर दाखवत घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पण पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती निवळली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना इशारा दिला आहे. योग्यवेळी योग्य उत्तर दिलं जाईल, असं प्रत्युत्तर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना दिलं आहे.