बीड सरपंच हत्या प्रकरण, लोकवर्गणीतून देशमुख कुटुंबाला 44,13,488 रुपयांची मदत, आमदार प्रकाश सोळंके यांची माहिती

| Updated on: Jan 03, 2025 | 6:11 PM

बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू असून 25 दिवसांनंतरही आरोपी फरार आहेत. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे, पण अनेक आरोपी अद्यापही पकडले गेले नाहीत. आमदार प्रकाश सोळंके यांनी मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिल्याची माहिती दिली. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरूनही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

बीड सरपंच हत्या प्रकरण, लोकवर्गणीतून देशमुख कुटुंबाला 44,13,488 रुपयांची मदत, आमदार प्रकाश सोळंके यांची माहिती
Follow us on

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेला आता जवळपास 25 दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीही या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहे. त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सीआयडीचा विविध पथकांच्या माध्यमातून तपास सुरु आहे. ही घटना प्रचंड भयंकर आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. संतोष देशमुख यांचे अत्यंत हाल करुन त्यांना संपवलं आहे. त्यामुळे या घटनेविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून लोकवर्गणी काढून देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “माजलगाव मतदारसंघाच्या वतीने मृतक संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एक मदत म्हणून 44 लाख 13 हजार 488 रुपये जमा करून दिले आहेत. अजून तीन ते चार दिवसांमध्ये लोक निधी गोळा करत आहेत. ते झाले की आम्ही आणून देणार आहोत”, अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली.

“आरोपींना अजूनही अटक झालेली नाही हे दुर्दैवी आहे. तसेच पोलीस यंत्रणा आणि तपास करणाऱ्या यंत्रणालाचं हे अपयश आहे असं मी मानतो. उद्या मी मुंबईला जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर देखील हा सगळा वृत्तांत घालणार आहे. दुर्दैवी आहे, बीड जिल्ह्यामधील पोलीस यंत्रणा संबंध उलटून गेलेली आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.

‘नवीन एसपी आल्याने शिस्तीचं वातावरण’

“दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत, असं प्रकाश सोळंके म्हणाले. निश्चितपणाने नवीन एसपी आल्याने एक शिस्तीचं वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी त्यांना सहकारी केलं पाहिजे. एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली कीड आहे. ही कीड काढायची असेल तर काही कालावधी त्यांना द्यावा लागेल. वेळोवेळी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात राहून या तपासात वेग मिळावा असा आमचा प्रयत्न आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘तांदूळे नावाच्या माणसाने आरोपीची भेट घेतली’

“सीआयडीच्या ऑफिसमध्ये तांदूळे नावाच्या माणसाने आरोपीची भेट घेतली. तिथे तो मोकाटपणे जातो, फिरतो. धनंजय देशमुख यांना परत धमकी देतो. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने पाहिले पाहिजे. सत्य काय आहे त्याची चौकशी एसपी साहेब आणि तपास यंत्रणा यांनी करावी. जिथे असे कार्यकर्ते मोकळेपणाने त्यांना भेटत असतील, चर्चा करत असतील तर हे दुर्दैव आहे. हे असं तपासामध्ये अडथळा निर्माण करणे आहे”, अशी टीका प्रकाश सोळंके यांनी केली.

‘…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाहून दूर करावं’

“आमच्या या प्रकरणात प्रामुख्याने दोन प्रमुख मागण्या आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाहून दूर करावं आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घ्यावं. जेणेकरून या जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, अवैध धंदे यांचं थैमान आहे, त्यांची मुळं जर उखाडून काढायची असतील तर तिथे कणखर माणूस पालकमंत्री झाला पाहिजे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे”, अशी भूमिका प्रकाश सोळंके यांनी मांडली.