बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी केली. सीआयडीकडून जवळपास एक तास त्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर ते बीड पोलीस ठाण्याबाहेर आले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सीआयडीच्या पथकाकडून काय काय विचारण्यात आलं? असा प्रश्न पत्रकारांकडून राजेश्वर चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे चौकशीचा भाग म्हणून त्यांनी मला बोलावलं. त्यांनी मला विचारलं की तुम्ही वाल्मिक कराडला ओळखता का? या जिल्ह्यात सगळ्यांना सगळे ओळखतात ना. मला विचारलं तू वाल्मिक कराडांना ओळखतो का? मी म्हटलं, हो ओळखतो. ते माजी नगराध्यक्ष होते, राजकारणात आणि समाजकारणात काम करणारी मंडळी आहेत, मी ओळखतो ना”, असं राजेश्वर चव्हाण म्हणाले.
तुम्हाला वाल्मिक कराड यांचा पत्ता विचारला का? असा प्रश्न पत्रकारांनी राजेश्वर चव्हाण यांना विचारला. त्यावर त्यांनी नाही, असं उत्तर दिलं. “नाही. आपल्याला काय माहिती, मला एवढंच विचारलं की तुम्ही ओळखत होता का? तर मी म्हणालो, हो. मी जिल्हाध्यक्ष असल्याने सगळेच मला ओळखतात. वाल्मिक कराड राजकारणात असल्याने ते ओळखीचे होते. ते आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते. ते मंत्री धनंजय मुंडे यांचे पीआरओ होते. ते पब्लिक रिलेशन्स पाहत होते. समाजात काम करणारा प्रत्येक माणूस तिथे यायचा”, असं राजेश्वर चव्हाण म्हणाले.
तुम्ही किती दिवसांपासून वाल्मिक कराड यांना ओळखत होता? असा प्रश्न राजेश्वर चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी 2021 मध्ये जिल्हाध्यक्ष झाल्यापासून वाल्मिक कराड यांना ओळखत होतो. त्यांच्यावर असलेल्या आरोपांची मला कोणतीही कल्पना नव्हती”, असं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी वाल्मिक कराडसोबत शेवटचं कधी बोलणं झालं होतं? असा प्रश्न राजेश्वर चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माझी आणि त्यांची भेट एक महिन्यांआधी झाली होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“मी गावाकडे होतो. मला चौकशीसाठी बोलावलं. मी म्हटलं चौकशीचा भाग म्हणून मी जिल्हाध्यक्ष आहे, माझी जबाबदारी आहे, जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया राजेश्वर चव्हाण यांनी दिली. “या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. तपासातून सर्व काही निषपण्ण होईल. जे कुणी आरोपी दोषी ठरतील त्यांना सरकार शिक्षा देणारच आहे”, असं राजेश्वर चव्हाण म्हणाले. सीआयडी चौकशीत विष्णू चाटे याच्याबाबत काही विचारलं का? असा प्रश्न यावेळी राजेश्वर चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विष्णू चाटे यांना त्यावेळीच आम्ही पक्षातून काढून टाकलं, असं उत्तर राजेश्वर चव्हाण यांनी दिलं.