बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “एका नेत्याने सांगितलं की, एक आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. चौकशी केली, काय झालं, कालपर्यंत ठिक होता. नाही म्हणे त्यांना सांगितलं कोणीतरी, काय सांगितलं, कुणी सांगितलं, नाही म्हणे आता पवार साहेबांचं वय झालंय. त्यामुळे आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.
“तुम्हाला सामूदायिक शक्ती एकत्र आल्यानंतर काय होतं, ते एकदा जिल्ह्याच्या जनतेच्या मदतीने आम्ही लोकांनी केलं होतं, इथल्या तरुण पिढीच्या मदतीने आम्ही एकेकाळी केलं होतं. ठिक आहे, सत्तेच्या बाजूने तुम्हाला जायचं आहे तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. अन्यथा लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत”, असा शब्दांत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना नाव न घेता सुनावलं.
“माझी तक्रार ही आहे की, भाजपचा पराभव केला आणि आज भाजपच्या दावणीला लागून तुम्ही सत्तेत आला. तुम्ही आज हे करतात, पण उद्या ज्यावेळेला मतदान करण्यासाठी लोकांना मतदान करण्याची संधी मिळेल त्यावेळेला तुम्हाला कुठे बसवायचं हा निकाल या जिल्ह्याचा मतदार दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
“बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, इथली उपस्थिती बघितली, मला जुन्या काळाची आठवण झाली. ती जुन्या काळाची आठवण, लोकांमध्ये राहणारी व्यक्ती किंवा नेतृत्व ही निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत असेल तर जनता त्यांच्या पाठीमागे राहते”, असं पवार म्हणाले.
“अनेक वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी असा प्रसंग आला, महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराने काम करत होतो. त्यावेळी असा एक काळ येऊन गेला, खऱ्या नेतृत्वासारखी एक वेगळी भूमिका काही लोकांनी मांडायला सुरुवात केली. सामान्य लोक अस्वस्थ होते. पण या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसारगर यांच्याकडे होते. काकूंनी भूमिका घेतली, कोणी काहीही भूमिका घेतली तरी नेत्याच्या विरोधात तडजोड करणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली, तरी मी माघार घेणार नाही. ती स्थिती आज त्यांच्या नातूने या ठिकाणी आणली याचा मला अतिशय आनंद आहे”, असं शरद पवार म्हणाले.