बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार यांच्या भाषणाआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाषण केलं. अनिल देशमुख यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असताना शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याबाबतचे आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख तब्बल 14 महिने जेलमध्ये होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यानंतर आज बीडमध्ये जाहीर सभेत त्यांनी त्यावेळी घडलेल्या घडामोडींची आठवण सांगितली.
“मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो. मला खोट्या प्रकरणात फसवण्यात आलं. केस कोर्टात गेली. माझ्यावर ज्या परमवीस सिंहने शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता, मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनीच जस्टीस चांदिवालच्या कोर्टात सांगितलं की, अनिल देशमुखांवर मी जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत. मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केले, असं त्यांनी कोर्टात सांगितलं. त्यावर हायकोर्टाने निर्णय दिला आणि मी तब्बल 14 महिन्यांनी जेलमधून बाहेर पडलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
“मी तुम्हाला सांगू इच्छितो 14 महिने मी आर्थर रोड जेलमध्ये होतो. एक चुकीच्या केसमध्ये, चुकीचा आरोप करुन मला फसवण्यात आलं होतं. मला तडजोड करण्याचा सल्ला देण्यात आलेला. मी तडजोड करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला जेलमध्ये टाकण्यात आलं. मी 14 महिने जेलमध्ये होतो. पण शरद पवार यांच्या आशीर्वादाने बाहेर आलोय. 14 महिने जेलचा भत्ता खावून बाहेर आलोय. कुणी माय का लाल अनिल देशमुखला मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही”, असंही ते म्हणाले.
“हे सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही. हे सरकार शेतकऱ्यांचं नुकसान करणारं आहे. या सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात, पण गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात जवळपास 19553 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तुम्ही विश्वास ठेवाल? ही शासकीय आकडेवारी आहे. अशाप्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे”, असं देशमुख म्हणाले.
“संविधानिक संस्था ईडी, सीबीआय यांचा दुरुपयोग करणं सुरु आहे. राजकीय पक्ष कशाप्रकारे अडचणीत येतील, सरकार विरोधात बोलणाऱ्याचा आवाज कशाप्रकारे दाबता येईल, या पद्धतीचा प्रयत्नसुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरु आहे”, अशी टीका अनिल देशमुखांनी केली.
“आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं शंभर टक्के सरकार येईल. तीनही पक्षांनी एकमेकांना सहकार्य केलं तर मविआचं सरकार येईल. तसेच लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याबाबत लोकांच्या मनात सहानुभूती आहे. हे तीनही लोकं जेव्हा महाराष्ट्रात फिरतील तेव्हा इंडिया आघाडीला देशात यश आल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.