बीड : महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण सध्या बदलताना दिसत आहेत. या समीकरणांमुळे एकमेकांच्या विरोधात असलेले राजकीय नेते आता परस्परांचे होताना दिसत आहेत. तर मित्र असलेले नेते आणि पक्ष यांच्यात एकमेकांविरोधात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अर्थाने सत्तेचा सारीपाट बघायला मिळतोय. वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध त्यांचे पुतणे अजित पवार असे दोन गट पडले. विशेष म्हणजे शरद पवार हे जवळपास एकटेच पडल्याचं चित्र आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झालाय. त्यानंतर आज बीडमध्ये अनपेक्षित असं चित्र बघायला मिळालं.
अजित पवार हे आधी विरोधी पक्षनेते होते. पण ते आता राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचादेखील समावेश आहे. धनंजय मुंडे आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीडमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी अनोखी गोष्ट बघायला मिळाली. एकमेकांच्या विरोधात असणारे बीडमधील मुंडे बहीण-भाऊ यांचा चक्क एकाच बॅनेरवर फोटो दिसला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या स्वागाच्या बॅनरवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बॅनर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो लावण्यात आला आहे. बीडच्या केज येथे धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले होते.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बहीण-भावांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष बघायला मिळतो. ते एकमेकांविरोधात सातत्याने टीका करत असतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी दोन्ही बहीण-भावामध्ये काँटे की टक्कर बघायला मिळाली होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर धनंजय मुंडे यांचा विजय झाला होता.
या निवडणुकीवेळी मुंडे बहीण-भाऊ एकमेकांच्या विरोधात सडकून टीका करत होते. तसेच दोन्ही बहीण भाऊ बीडमध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले तर ते एकमेकांना टोले लगावण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण आता राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांची मैत्री झालीय. त्यामुळे मुंडे बहीण-भाऊ एकत्र येतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.