बीड | 2 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. आंदोलकांनी त्यांच्या गाड्या आणि बंगल्याला आग लावली होती. तसेच त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेवर आमदार प्रकाश सोळंके यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे कार्यकर्ते हे मराठा समाजाचे नव्हते. तर बिगर मराठे होते. ते आपल्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते होते, अशा दावा प्रकाश सोळंके यांनी केलाय. विशेष म्हणजे या 250 ते 300 समाजकंटकांपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीच आपल्याला वाचवलं. त्यांच्यामुळेच आपला जीव वाचला, असं मोठं वक्तव्य प्रकाश सोळंके यांनी केला.
“माझ्या बंगल्यासमोर जो जमाव होता त्यामध्ये मराठा समाजाशिवाय इतर देखील माणसं होती. त्याचबरोबर जे अवैध धंदे करणारे आहेत, वाळू, गुटखा, हातभट्टी, धान्याचा काळाबाजार करणारे जे लोकं होते त्यांचासुद्धा समावेश त्या लोकांमध्ये होता. माझे 30 ते 35 वर्षांपासूनचे काही राजकीय विरोधक आहेत त्यांचे काही कार्यकर्ते त्या जमावात दिसत होते. त्यांच्या संस्थेत काम करणारे कर्मचारी आणि शिक्षक हे सुद्धा त्या जमावात होते”, असं मोठं स्पष्टीकरण प्रकाश सोळंके यांनी केलं.
“या प्रकारातील साधारणपणे 200 ते 250 लोकं त्या जमावात होते, असं माझ्या लक्षात आलं. हे 200 ते 250 लोकं माझ्या घरी पूर्ण तयारीने आली होती. त्यांच्याकडे शस्त्रही होती. कुऱ्हाडी होत्या, त्यांच्या सॅकमध्ये पेट्रोल बॉम्ब होते. मोठ्या प्रमाणात दगड होते. पूर्वनियोजित कट करुन हे लोकं माझ्या घरावर दगडफेक करत होते. माझ्या घरात घुसून त्यांनी जाळपोळ केली. फर्निचरचं नुकसान केलं”, असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला.
“माझ्या तीन गाड्या जाळल्या. मला भेटायला आलेले कार्यकर्ते होते त्यांची गाडी जाळली. सात-आठ मोटरसायकल होत्या. त्यामध्ये पोलिसांच्याही मोटरसायकल होत्या. ते ज्या तयारीने आले होते ते पाहता त्यांचा डायरेक्ट हेतू दगडफेक, जाळपोळ बरोबरच माझ्या जीविताला हानी पोहोचावी, अशा दृष्टीने प्लॅनिंग करुन आले होते. त्या दृष्टीने ते घरामध्ये घुसून माझ्यापर्यंत हल्ला करण्यासाठी आले होते. पण मी घरातच एका ठिकाणी बसलो होतो, तिथे ते पोहोचू शकले नाहीत”, अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली.
“आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. त्या फुटेजमध्ये 200 ते 250 जणं दगडफेक करत होते. तर इतर आंदोलक या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. ज्यांनी मला संरक्षण दिलं ते मराठा समाजाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला सीसीटीव्हीचे फुटेज दिले आहेत. त्यामध्ये समाजकंटक, माझा राजकीय विरोध करणारे, माझे राजकीय विरोधक स्पष्टपणे दिसत आहेत. मी पोलिसांकडे मागणी केलीय की, सरसकट सर्वांना अटक न करता तुम्हाला कॅमेऱ्यात दगडफेक करताना जे दिसत आहेत त्यांनाच अटक करण्याची विनंती केलीय”, असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.
“सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 21 आरोपी भेटले आहेत. त्यापैकी 8 आरोपी हे मराठा व्यतिरिक्त आहेत. ते कोणत्या जाती-धर्माचे आहेत ते मला माहिती आहे, पण मला बोलायचं नाही”, असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.