Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी महिलांची दिंडी, अनेकदा डावलल्यानंतर आता तरी संधी मिळणार?

| Updated on: Jul 07, 2022 | 9:20 PM

त्यांनी देवीला साकडं ही घातला आहे. त्यामुळे अनेकदा डावलेल्या पंकजा ताईंना आता तरी मंत्रिमंडळात संधी मिळणार का? असा सवाल साहजिकच राज्याच्या राजकारणात विचारण्यात येत आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी महिलांची दिंडी, अनेकदा डावलल्यानंतर आता तरी संधी मिळणार?
पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात संधी मिळणार? भाजपचे कोणते नेते पुन्हा रेसमध्ये? वाचा सविस्तर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच नवं सरकार स्थापन झाल्यानंतर (Maharashtra Government) आणि नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर (Eknath Shinde) आता राज्याला वेध लागले आहेत ते नव्या मंत्रिमंडळाचे, या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी अनेक नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या गटातील अनेक नेते मंत्रिमंडळासाठी (Cabinet) सध्या लाईनमध्ये आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून ही अनेक बड्या नेत्यांची नावे मंत्रिमंडळासाठी चर्चेत आहे. त्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, अशी अनेक मोठी नावं आहेत. मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दिंडी काढत मागणी केली आहे. तसेच त्यांनी देवीला साकडं ही घातला आहे. त्यामुळे अनेकदा डावलेल्या पंकजा ताईंना आता तरी मंत्रिमंडळात संधी मिळणार का? असा सवाल साहजिकच राज्याच्या राजकारणात विचारण्यात येत आहे.

महिलांनी पायी दिंडी काढली

नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान मिळावं. या करिता बीड मधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर येथील मोहटा देवीला साकडं घालत पायी दिंडी काढली आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या दिंडीला सुरुवात झाली असून 80 किलोमीटर ही दिंडी पायी जाणारा आहे. विधान परिषदेत देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची संधी हुकली, याआधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातून वगळण्यात आलं होतं. आता मात्र या नवीन सरकार मध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळावे याकरिता पंकजा मुंडे समर्थक हे पुन्हा आग्रही झाले आहेत.

पाहा व्हिडिओ

यावेळी संधी मिळणार?

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनेता पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अनेकदा पंकजा मुंडेंच नाव चर्चेत आलं. अलीकडेच राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपकडून अनेक नेत्यांना संधी दिली गेली. सुरुवातीला राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ही पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आलं. मात्र तिथेही त्यांची संधी हुकली. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणार असल्यास बोललं जाऊ लागलं. मात्र त्या यादीत ही पंकजा मुंडे यांचे नाव आलं नाही. आता पुन्हा राज्यात मोठा सत्ता बदल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी याआधीही जोरदार आंदोलन केली आहेत. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ही घोषणाबाजी झाली आहे.