शाळेसाठी गावातले चिमुकले विद्यार्थी एकवटले, स्थलांतराला तीव्र विरोध, अतिशय भावनिक प्रसंग

| Updated on: Aug 25, 2023 | 9:18 PM

पांगरी गावचे चिमुकले विद्यार्थी आज एकवटले. आपली शाळा आता दुसऱ्या गावात स्थलांतरीत होणार या विचाराने ते त्रस्त होते. एका विद्यार्थीनीने माईक हातात घेऊन आमची शाळा दुसरीकडे नेऊ नका, अशी विनवणी करत भाषण केलं. यावेळी इतर ग्रामस्थांनी देखील विद्यार्थ्यांची मागणी लावून धरली.

शाळेसाठी गावातले चिमुकले विद्यार्थी एकवटले, स्थलांतराला तीव्र विरोध, अतिशय भावनिक प्रसंग
Follow us on

संभाजी मुंडे, Tv9 मराठी, बीड | 25 ऑगस्ट 2023 : आपल्या गावातील शाळा दुसरीकडे घेऊन जात असतील तर विद्यार्थ्यांना किती त्रास होऊ शकतो, याबाबत आपण कल्पानाही करु शकत नाही. लहानपणी आपल्याला शाळेत ‘माझी शाळा’ अशा विषयावर निबंध लिहायला सांगण्यात आलंय. अनेकांनी ‘माझी शाळा’ या विषयावर खूप मनमोकळेपणाने निबंध देखील लिहिला आहे. शाळेबद्दलच्या आठवणी वेगळ्या असतात. शाळाबद्दलचं आणि शाळेतील शिक्षकांबद्दलचं नातं फार वेगळं आणि अतिशय भावनिक असतं. शाळा आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवते, पण आपण ज्या शाळेत घडतो ती शाळा दुसऱ्या गावात स्थलांतरीत होणार अशी माहिती विद्यार्थ्यांना समजली तर त्यांची काय भावना असू शकते? याबाबत आपण कल्पनाही करु शकणार नाही.

आपल्या गावात शाळा असणं ही भावनाच वेगळी असते. आपल्या गावात शाळा असणं ही एक अभिमानाची गोष्ट असते. कारण गावातल्या गावात शाळा असली की आपला वेळ वाचतो. याशिवाय गावातील नव्या पिढीचा शिक्षणाचा प्रश्न मिटतो. ग्रामीण भागातील नागरीक शेतीचं काम करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचे कामे सांभाळून शिक्षण करावं लागतं. त्यामुळे गावातच शाळा असती तर त्यांच्यासाठी सोयिस्कर होते.

याशिवाय गावात शाळा असती तर गावातील विद्यार्थ्यांची पायपीट वाचते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षणासाठी आजूबाजूच्या मोठ्या गावांमध्ये पायपीट करत जावं लागतं. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी नदी ओलांडून जावं लागतं. पण गावात शाळा असली तर ती पायपीट वाचते. बीडच्या परळीमध्ये एका गावातील शाळा दुसरीकडे स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी भावूक झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळा इथून कुठेच नेऊ नका, अशी विनवणी केली आहे.

नेमकं प्रकरम काय?

परळी तालुक्यातील पांगरी येथील शाळेच्या स्थलांतराच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. पण ही शाळा स्थलांतर करू नका, अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली आहे. संस्थाचालक फुलचंद कराड यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. पांगरी गावात श्री संत भगवान बाबा शिक्षण प्रसारक अंतर्गत शाळा आहे. पण काही लोकांमुळे शाळेच्या ठिकाणी अतिक्रमण करून खाजगीकरणाचा घाट घातला जातोय. यालाच ग्रामस्थांनी विरोध दर्शवित परळी बीड महामार्गावर रास्ता रोको केला होता. दरम्यान आज ही शाळा स्थलांतर करू नका, अशी विनवणी आणि मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या मागणीवर शाळेचे संस्थाचालक फुलचंद कराड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. “गेल्या 32 वर्षापासून शाळा या ठिकाणी चालू आहे. या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा आपण येथे सुरू केली. पांगरी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या कोणाचाही या शाळेला विरोध नाही. पण काही मूठभर लोक केवळ शाळेची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचा विरोध करून आंदोलन करत आहेत हे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया फुलंचद कराड यांनी दिली.