केज कोर्टात मोठा ट्विस्ट, वाल्मिक कराडच्या सुनावणीआधी सरकारी वकिलाने ऐनवेळी केस सोडली

| Updated on: Dec 31, 2024 | 10:46 PM

वाल्मिक कराड याने खंडणी प्रकरणात शरणागती पत्करली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला केजमध्ये आणण्यात आलं आहे. थोड्याच वेळात वाल्मिकला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वाल्मिकला कोर्टात हजर करण्यापूर्वीच सरकारी वकिलाने केस लढवण्यास नकार दिला आहे. सरकारी वकिलाने माघार घेतल्याने आता मोठा पेच निर्माण झाला आहे. आजच या प्रकरणात नवीन सरकारी वकील दिला जाणार का? या वकिलाला प्रकरणावर युक्तिवाद करण्यास पुरेसा वेळ मिळणार का? या सर्व पेचामुळे वाल्मिक कराडला जामीन मंजूर होणार की तुरुंगात जावं लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे थोड्याच वेळात मिळणार आहे.

केज कोर्टात मोठा ट्विस्ट, वाल्मिक कराडच्या सुनावणीआधी सरकारी वकिलाने ऐनवेळी केस सोडली
Follow us on

केज कोर्टातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या रिमांडबाबत केज कोर्टात रात्री उशिरा सुनावणी पार पडत आहे. सीआयडीचं पथक रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास केजमध्ये दाखल झालं. त्यानंतर त्याला केजच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर त्याला घेऊन सीआयडी पथक केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. तिथे तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर वाल्मिक कराडला केज कोर्टात आणण्यात येणार होतं. पण त्याआधीच केज कोर्टात वेगळ्यात घडामोडी घडल्या.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वाल्मिक कराडची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी चक्क दोन-दोन वकील दाखल झाले. तर सीआयडीची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे दाखल झाले. ते सीआयडीची बाजू कोर्टात मांडणार होते. पण सुनावणीला अवघे काही क्षण सुरु असताना मोठी घडामोड घडली. सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी कोर्टाकडे पत्र दिलं. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव या प्रकरणात अन्य वकील नेमावा म्हणून पत्र दिलं. त्यामुळे आता जे बी शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करणार आहेत. आधीचे सरकारी वकील देशपांडे यांनी केस सोडली आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या बाजूने वकील हरिभाऊ गुठे आणि दूसरे वकील अशोक कवडे हे युक्तिवाद करणार आहेत. ते केज कोर्टात रात्री दहा वाजेपासून हजर आहेत.

वाल्मिक कराडने आज सीआयडीच्या पुणे येथील कार्यालयात स्वत:ला सरेंडर केलं होतं. त्यानंतर सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेला रवाना झालं होतं. वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी व्हावी, अशी विनंती सीआयडीने कोर्टात केली होती. केज कोर्टाने सीआयडीची मागणी मान्य केली. त्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराड याला घेऊन आज रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास केज येथे दाखल झाले.

हे सुद्धा वाचा