मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कामाला लागले आहेत. राज ठाकरे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेत आहेत. या दरम्यान राज ठाकरे आज परभणी येथून बीडमध्ये दाखल झाले. बीडमधील हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पण राज ठाकरे संबंधित हॉटेल परिसरात आले तेव्हा मोठा राडा झाला.
राज ठाकरे हॉटेल परिसरात दाखल होताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत सुरु झालं. पण याचवेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबपाजी केली. ‘सुपारीबाज चले जाओ’, अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या आंदोलकांकडून करण्यात आली. आंदोलकांनी पिशवीभरुन सुपाऱ्यादेखील आणल्या होत्या. त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूने धक्कबुक्की झाली.
अखेर वाद वाढण्याआधी पोलिसांनी योग्यवेळी मध्यस्थी करत प्रकरण निवळलं. पण तोपर्यंत भरपूर राडा घडून गेला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे राज ठाकरे हे नाराज झाले आहेत. राज ठाकरे यांनी पोलिसांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित राड्यानंतर पोलीस अधीक्षक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी राज ठाकरे यांनी पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. कोणाच्याही बाबतीत असे प्रकार पुन्हा घडता कामा नये, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी राड्यानंतर पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. “तुमची यंत्रणा सतर्क नव्हती का?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांच्यासोबत धाराशिवमध्ये दोन दिवसांपूर्वी असंच काहीसं घडलं होतं. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक त्यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे धाराशिवमध्ये थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले. त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली. पण राज ठाकरे यांनी भेटण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. आंदोलकांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडला. यानंतर राज ठाकरे बाहेर आले. त्यांनी दोन आंदोलकांना बैठकीसाठी बोलावलं. पण आंदोलकांना सर्वांसोबत यायचं होतं. पण ते राज ठाकरे यांना मान्य नव्हतं. यामुळे आंदोलकांनी आणखी गोंधळ घातला होता. हा गोंधळ बराच काळ चालला होता.