बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आज सकाळीच मोठी बातमी समोर आली. प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातील दोघांना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील सुदर्शन घुले हा घटनेपासून फरार आहे. ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर असा त्याचा गुन्हेगारीचा आलेख असा उंचावत गेला. त्याला तालुक्याचा भाई व्हायचे होते. आपली दहशत निर्माण करायची होती. कोण आहे हा खलनायक सुदर्शन घुले?
त्याला तर डॉन व्हायचे होते
मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या करणारा सुदर्शन घुले याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी, नेतेगिरीचे खूळ होते. जेमतेम 7 वीपर्यंत शिकलेला सुदर्शन हा घरात एकुलता एक आहे. त्याच्या वडिलांचे अगोदर निधन झाल्याने घरात तो आणि त्याची आई असो दोघेच होते. बड्या नेत्यांसारखं आपण मिरवायचं यासाठी त्याची पावलं फार पूर्वीपासून पडत होती. तो एका गॉडफादरच्या शोधत होता.
विष्णू चाटेच्या आला संपर्कात
त्याच्याकडे दोन ते चार एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती समोर येत आहे. पण मुळातच त्याला शेतीच्या कामात काही रस नव्हता. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे. कार्यकर्ता म्हणून मिरवायचं. तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असा त्याचा नाद होता. त्यातच तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. ऊसतोड कामगारांकडून काम करून घेणे. जो कामाला आला नाही, त्याच्याकडून पैशांची वसूली करणे असे काम तो करत होता.
याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे स्थानिक सांगतात. वरिष्ठ जे सांगतील ते काम करण्याची तयारी त्याने केली. धमक्या देऊन वसूली करण्याचेच नाही तर चोरी करण्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर लागलेले आहेत. त्यातच पवनचक्की आणि इतर धंद्यांमधून वरिष्ठांची मर्जीसाठी धमकावणे, खंडणी मागण्याचे काम त्याने सुरू केले.
संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात मुख्य आरोपी
मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू असताना खंडणीच्या वादातून सुदर्शन घुले तिथे पोहचला. त्याचा सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यातून आपला अपमान झाल्याचे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना वाटलं. त्यातूनच त्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण खून केला. पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांना मोस्ट वाँटेड आरोपी म्हणून घोषीत केले आहे.