खंडणीतला आरोपी आणि संतोष देशमुखच्या हत्येमागचा मास्टरमाईंडचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. पण कराड सरेंडर करणार ही माहिती पोलीस खबऱ्यांना मिळाली. माध्यमांपासून अनेक नेत्यांपर्यंतही पोहोचली. सकाळी 9 च्या दरम्यान वाल्मिक कराड आज सरेंडर करणार असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकते. १० पर्यंत पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात पोलीस तैनात होतात. 11 वाजून ५५ मिनिटांनी आरोपी वाल्मिक कराड स्वतः व्हिडीओ बनवून सोशल मीडियात पोस्ट करतो. फरार झाल्यानंतरच्या इतक्या दिवसानंतर आपल्या हत्येशी संबंध नसल्याचं कराड सांगतो आणि व्हिडीओ पोस्ट झाल्याच्या 10 मिनिटातच फिल्मी स्टाईलनं वाल्मिक कराडची गाडी सीआयडी कार्यालयात येते.
आरोपीच्या या समर्पणावरुन विरोधक टीका करतात. तर सत्ताधारी नेते या समर्पणाला कारवाईचं यश मानतात. आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, “गुन्हेगारीचा हा कोणता नवीन पॅटर्न? यूपी, बिहारमध्येही अशाप्रकारे आरोपी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत नसेल. आरोपी आधी व्हिडीओ प्रसिद्ध करतो. स्वतःला निर्दोष ठरवतो आणि मग पांढऱ्या शुभ्र SUV मधून स्टाईलमध्ये पोलीस कार्यालयात इंट्री मारतो. काय म्हणावं याला?”
अंजली दमानियांनी म्हटलं की, “दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं का? ही पोलिसांसाठी नामुष्की आहे. 17 तारखेला वाल्मिक कराडचा शेवटचा कॉल पुण्यात ट्रेस झाला होता. आणि सरेंडरही पुण्यातच झालं. ह्याचा अर्थ इतके दिवस आरोपी पुण्यातच होता. पुण्यात राहूनही पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का? राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.”
या साऱ्यात सर्वात रंजक प्रतिक्रिया काही आरोपी कराडसोबत आलेल्या आणि काही त्याच्या समर्थनासाठी आलेल्या लोकांनी दिल्या. कराडसोबत गाडीत बसून जे सहकारी आले, त्यांच्या उत्तरांचा कशासाच कशाला मेळ लागत नव्हता. कराडसोबत असलेला परळीचा एक नगरसेवक म्हणत होता की परवापासून मी कराडांसोबत आहे आणि परवापासून ते म्हणजे वाल्मिक कराड पुण्यातच आहेत. दुसरा व्यक्ती सांगतो की आम्ही काल कराडांसोबत अक्कलकोटवरुन पुण्यात आलो. परत हाच व्यक्ती १० मिनिटांनी सांगतो मी एकटा अक्कलकोटवरुन आलो. मीडियाच्या बातम्या समजल्यानंतर आम्ही इकडे वाल्मिक कराडांसाठी जमलो.
पत्रकारानं प्रश्न केला की., तुम्ही गाडीत बसून सोबत आलाय, कुठून बसून आलात तुम्ही? तुमचं नाव काय?
उत्तर- माझं नाव शरद मुंडे, मी नगरसेवक आहे. कराडांवरचे आरोप खोटे आहेत
पत्रकार- नाही पण तुम्ही रात्री कुठं होतात, बीडची गाडी आहे, कुठून आलात आता?
यावर समोरचा व्यक्ती काहीच उत्तर देत नाही
यानंतर कराडसोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारला जातो, तुम्ही सोबत कुठून आलात?
उत्तर – आम्ही आता देवावरुन आलो
कोणत्या देवाला गेले होते?
उत्तर- आपलं…कोणतं?…ते? श्री स्वामी समर्थ कोणतं ते?
पत्रकार- अक्कलकोटला?
उत्तर – हो…अक्कलकोटला
प्रश्न- रात्री तुम्ही अक्कलकोटवरुन आले का?
उत्तर – हो तिथूनच आलो
मग 8 दिवस कराड कुठे होते?
उत्तर – ते 8 दिवस कुठे होते मला माहित नाही
पत्रकार विचारतो, मग तुम्हाला कराड कधी आणि कुठे भेटले
उत्तर – मला मंदिरात भेटले कोणत्या मंदिरात यावर तो व्यक्ती म्हणतो की कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले. थोड्या वेळानं आम्ही अक्कलकोटवरुन वाल्मिक कराडसोबत आलो. म्हणणारा व्यक्तीच सांगतो की मी एकटा आलो. माझ्यासोबत कराड नव्हते.