बीडमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थकाने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आंदोलनातील एका तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकलं आणि नंतर स्वत:ला पेटवून घेतलं. यावेळी इतर आंदोलकांनी त्याच्या पायाला लागलेली आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे आंदोलक तरुणाच्या दोन्ही पायांना भयानक आग लागलेली होती. तरीही तो तरुण आक्रमकतेने घोषणाबाजी करताना दिसला. या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनी कार्यकर्त्यांना असं कोणतंही टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे हे परळीच्या दिशेला रवाना झाल्याचीदेखील माहिती समोर येत आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचे समर्थक आज दुपारपासून आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली. तसेच कराडच्या समर्थकांचं आज सकाळपासून परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. तसेच बीडमध्ये ठिकठिकाणी कराडच्या समर्थकांकडून आंदोलन सुरु आहे.
असं असतानाच आता या आंदोलनाला वेगळं रुप मिळताना दिसत आहे. कारण कराडच्या एका समर्थकाने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. इतर आंदोलकांनी या आंदोलकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. इतर आंदोलकांनी तरुणाच्या पायांना लागलेली आग विझवली. पण तोपर्यंत तरुण आंदोलकाचे पाय भाजले. यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अतिशय चित्तथरारक आहे. या घटनेनंतर वाल्मिक कराड याची पत्नी मंजिरी कराड यांनी आंदोलकांना असं कोणतंही टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे.
“मी तुमचं आण्णावरचं प्रेम समजू शकते. पण आपल्याला असं कुठल्याही प्रकारचं कृत्य करायचं नाही. तुमचं आण्णावर प्रेम आहे हे मी समजू शकते. ही चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला आंदोलन करायचं आहे. आपल्याला असं जखमी होऊन कुठे दवाखान्यात जाऊन बसायचं नाही. आपल्याला पूर्ण स्ट्राँग राहून संघर्ष करायचा आहे. त्यामुळे कुणीही असं गैरकृत्य करु नका”, असं आवाहन मंजिरी कराड यांनी केलं आहे.