कोणतंही कारण असो, आत्महत्या हा त्यावर पर्याय असूच शकत नाही. खरंतर मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण आत्महत्या करणं अतिशय चूक आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचं अकाली निधन झालं म्हणून आपणदेखील तसा टोकाचा निर्णय घेणं असा विचार करणं अतिशय चूक आहे. संकट हे सांगून येत नाही. ते येतं. नियतीचा भोग म्हणून अशा संकटाला सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे अशा संकट काळात संयमाने परिस्थिताला सामोरं जाणं अपेक्षित आहे. पण काही जण संयम सोडून आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतात. बीड जिल्ह्यातदेखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा एका धक्कादायक घटनेने हादरलं आहे. शिक्षक पतीच्या निधनानंतर पत्नीने विषारी औषध पिवून स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खामकरवाडी येथे ही घटना आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खामकर वाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून पती पाठोपाठ आपला जीवन प्रवास थांबवला या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामकरवाडी येथील शिक्षक कन्हैया लाल खामकर (वय 52 वर्ष) हे तालुक्यातील आर्वी केंद्रांतर्गत असलेल्या शिंदे वस्ती शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करीत होते. त्यांना आज (21 नोव्हेंबर, वार-गुरुवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा शोक कुटुंब व्यक्त करीत असतानाच त्यांच्या पत्नी राहीबाई कन्हैयालाल खामकर (वय 45 वर्ष) यांनी पुढील काही वेळातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.