स्पेशल रिपोर्ट : ‘…तर हात कापून टाकेन’, भाग्यश्री आत्राम यांचा मंत्री असलेल्या वडिलांनाच इशारा

| Updated on: Sep 12, 2024 | 10:25 PM

उपमुख्यमंज्ञी धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्रामांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेत आता बाप-लेकीची लढाई होईल. विशेष म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्रामांनी आपल्या कार्यकर्त्यांना हात लावल्यास हात कापणार, असा इशाराच दिला आहे.

स्पेशल रिपोर्ट : ...तर हात कापून टाकेन, भाग्यश्री आत्राम यांचा मंत्री असलेल्या वडिलांनाच इशारा
भाग्यश्री आत्राम यांचा मंत्री असलेल्या वडिलांनाच इशारा
Follow us on

वडील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच भाग्यश्री आत्रामांनी थेट इशाराच दिला. माझे वडील शेर तर मीही शेरणी. पण कार्यकर्त्यांना हात लावला तर हात कापून टाकेन, असा इशाराच भाग्यश्री आत्रामांनी दिला. भाग्यश्री आत्राम, या धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. मात्र भाग्यश्री यांनी वडिलांची साथ सोडत शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्रामांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. “धर्मराव बाबांच्या भूमिकेनं भाग्यश्री कायम दु:खी होत्या”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना घरात फूट पडू देऊ नका, असं आवाहन केलं होतं .त्यावरुन भाग्यश्रींनी अजित पवारांवर पलटवार करताना, आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते बघा, असा सनसनाटी टोला लगावला. दादा ज्ञान देतात, तुम्ही शरद पवारांना सोडून घर फोडलं, असं भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.

धर्मराव बाबांचा मुलीला तिच्या सासरच्यांसह नदीत फेकण्याचा इशारा

अहेरी विधानसभा मतदारसंघात आता बाबा आत्रामांविरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम असा सामना होणार आहे. अजित पवारांनी घर न फोडण्याचा सल्ला दिला, त्याच सभेतून बाबा आत्रामांनी मुलगी भाग्यश्रीसह तिच्या सासरच्या हलगेकर कुटुंबाला नदीत फेकण्याचा इशारा दिला होता. त्यावरुनही भाग्यश्रीनं प्रतिक्रिया दिलीय. वडिलाच्या अशा बोलण्यानं खूप दुखावली, अशी प्रतिक्रिया भाग्यश्री यांनी दिली होती. तर शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी अजित दादांनी पवारांच्या पाठीत सुरा खूपसला त्यांना कुठं फेकायचं? असा खोचक सवाल केला.

अजित पवारांच्या बंडामुळे आणि लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रांना उभं केल्यानं पवार कुटुंबात फूट पडली, हे स्वत: अजित पवारांनीच मान्य केलं. तीच घटना, आता आत्राम कुटुंबात झालीय. आता पुढचा सामना विधानसभेच्या निवडणुकीत असेल, जिथं धर्मराव बाबा आत्रामांविरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर उभी असेल.