तेजस मोहतुरे
भंडारा : भंडाऱ्यात क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी तलवारीने वार करून मित्राची हत्या केली. त्यानंतर वैनगंगा नदीत मृतदेह फेकला. कारधा (Kardha) येथील वैनगंगा पुलावर ही थरारक घटना घडली. हत्या केल्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी आरोपींनी मृतदेह वैनगंगा (Wainganga) नदीत फेकून दिला होता. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी (Bhandara City Police) चार आरोपींना अटक केली. महेंद्र उर्फ टिंकू दहीवले (वय 36 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. शुभम नंदूरकर (वय 21 वर्ष), निशांत कटकवार (वय 19 वर्ष), दीपांशु शहारे (वय 20 वर्ष) व हेमंत पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मृतक बेला येथील शुभाष वॉर्ड निवासी महेंद्र दहीवले हा 10 मार्च रोजी पासून बैपत्ता होता.
घरातून बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा शहर पोलिसाना 14 मार्चला प्राप्त झाली. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. मृतकाने 9 मार्च रोजी आपल्या मित्रासोबत पार्टी केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे पार्टीत उपस्थित लोकांची फेर तपासणी करण्यात आली. आरोपी शुभम आणि मृतकाचे पार्टी दरम्यान जोरदार भांडण झाले होते, त्यावेळी मृतक महेंद्रने आरोपी शुभमला मारहाण केली होती. दुसऱ्या दिवशी 10 मार्चला आरोपीने आपल्या मित्रासोबत मृतकाचा घरी जात भांडण केले. यात शुभमच्या मनात काही अजून कट शिजत होता. त्याने मृतक महिंद्र यास माफी मागत समजवत आपल्यासोबत पार्टीला घेऊन गेले.
दरम्यान, कारधा नदीच्या पुलावर दारू पार्टी झाली. आरोपी शुभम यांनी महेंद्र यास पुन्हा मारहाण केली. तलवारीने वार केले. यात महेंद्र गंभीर जखमी होत पळू लागला. मात्र सर्व आरोपींनी त्याला पकडून नदीत फेकून दिले. मृतदेह बाहेर येऊ नये म्हणून बासाने बांधून ठेवले. आरोपीच्या कबुलीजबाबानंतर 4 ही आरोपींना अटक केली आहे. भंडारा शहर पोलिसांनी नदीतून मृतदेह हस्तगत केला. आरोपी विरुद्ध भंडारा शहर पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी दिली.