सदावर्तेंची बायको जिथं, तिथं राडा आलाच; एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा ठरली वादळी

| Updated on: Sep 19, 2024 | 5:12 PM

ST Bank Meeting : भंडारा येथील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा वादळी ठरली. मोठ्या गदारोळानंतर एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा संपवण्यात आली. पोलिसांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विरोधकांनी ठराव आणला. तर मारहाण केल्याप्रकरणी सदावर्तेंच्या समर्थकांनी भंडारा पोलिसांत तक्रार दिली.

सदावर्तेंची बायको जिथं, तिथं राडा आलाच; एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा ठरली वादळी
एसटी बँकेची सभा ठरली वादळी
Follow us on

भंडारा येथील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा वादळी ठरली. गुणरत्न सदावर्ते यांचे समर्थक आणि विरोधक भिडले. यावेळी पोलिसांवर पण खुर्च्या भिरकावण्यात आल्या. जिथं सदावर्ते पती पत्नी आहे, तिथं निश्चितपणे राडा आलाच, अशी तिखट प्रतिक्रिया एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनविण्याचा कुटील डाव रचल्याचा आरोप त्यांनी केला.

सभास्थळ नव्हे राडा स्थळ

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण 71 वी सभा भंडाऱ्यात आयोजित करण्यात आली होती. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा अक्षरश: उधळून लावली. वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी महापुरूषांसह नथुराम गोडसे यांच्या छायाचित्र लावल्याचा मुद्दा रेटून धरत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी वाद वाढला आणि विरोधकांनी अक्षरश: अहवालाची पुस्तकं फाडून विरोधकांवर फेकले. वाद वाढल्यानंतर एकमेकांना धक्काबुकी करत खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. खुर्च्या एकमेकांवर फेकण्याचा प्रकार घडला.

हे सुद्धा वाचा

यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारण्यात आल्यात. एसटी कामगार कृती समिती या सभेतून बाहेर पडली आणि त्यांनी लगतच्या दुसऱ्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली. तर, सत्ताधाऱ्यांनी ही सभा तहकूब केल्याची घोषणा केली. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या फेकून मारल्या प्रकरणी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. कर तिकडे विरोधकांनी गुणरत्न सदावर्ते यांनी 35 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ठराव मंजूर केला.

जिथं सदावर्ते पती-पत्नी, तिथे राडा आलाच

जिथं सदावर्ते पती-पत्नी आहे, तिथं निश्चितपणे राडा आलाच. सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनविण्याचा कुटील डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनविल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. आज भंडाऱ्यात पार पडलेली सभा ही कुठल्याही नियमानुसार कायद्यानुसार झालेली नाही. गुणरत्न सदावर्ते हे स्वतः वकील असून बँकेतून त्यांनी 35 लाख रुपये लुटले. सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित केला. 34 कोटींचे डेटा सेंटर आणलेत त्यात मोठा अपहार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण सभासदांना या सभेत बोलण्याची संधी दिली नाही त्यामुळे ही सभा उधळून लावली, अशी प्रतिक्रिया संदीप शिंदे यांनी दिली.

हा बँकेला बदनाम करण्याचा डाव

गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक सदावर्ते यांनी हिसकावली. सोन्याची अंडी देणारी बँक अशी काँग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेमध्ये त्यांनी हा राडा केला आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये सर्वसामान्य कर्मचारी ज्यामध्ये चालक, वाहक, तांत्रिक यांना निवडून आणण्यात सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका होती. मागील 30-40 वर्षांमध्ये जे करू शकले नाहीत, अशी काँग्रेस – राष्ट्रवादीची धारणा झाली आणि त्यामुळेच बँकेला हा बदनाम करण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली.