मुंबई : एक दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईत माटुंगा परिसरात एका कारने पेट घेतला. यामध्ये दोन भावंडांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. बी ए रोडवर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे सर्वच जण हादरले आहेत. एक CNG कार रस्त्यावरच्या डिवायडरला धडकली. ,कारमधील सर्व जण पार्टीनंतर कारमधून मौजमजा करण्यासाठी निघाले होते. “डिवायडरला धडकल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाला नाही” असं अग्निशमन दलातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने म्हटलं आहे. स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर दोघेही घटनास्थळी दाखल झाले.
प्रेम वाघेला (18) आणि अजय वाघेला (20) अशी दोन मृतांची नाव आहेत. दोघेही भाऊ होते, असं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. कारमधील सर्व प्रवासी उपनगर मानखुर्दमधील रहिवासी आहेत, असं सायन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पार्टीनंतर ते दक्षिण मुंबईत मरीन ड्राइव्हला चालले होते, त्यावेळी हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी डाव्या बाजूचे दोन्ही दरवाजे जॅम झाल्याने उघडले नाहीत.
कारमधील तिघांची प्रकृती कशी आहे?
कारमधील हर्ष कदम (20) हा मुलगा 60 ते 70 टक्के भाजला आहे. हितेश भोईर (25) आणि ड्रायव्हर कुणाल अत्तर (25) हे सुद्धा दुर्घटनेत गंभीररित्या भाजले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी नंतर कारची आग विझवली व जखमींना सायन रुग्णालयात नेलं. ही सीएनजी कार होती. डिवायडरला धडकल्यामुळे पेट घेतला असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. “प्राथमिक माहितीच्या आधारावर अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.