गोंदिया : गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून (Birsi Airport) प्रवासी वाहतुकीचा प्रश्न अखेर सुटला. 13 मार्चपासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे. बिरसी विमानतळावरून इंदोर ते गोंदिया ते हैदराबाद असे पहिले उड्डाण उडेल. या सेवेविषयी भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. व्यापार आणि अन्य दृष्टिकोनातून विमान सेवा महत्त्वाची आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे रविवारपासून सुरू होणाऱ्या सेवेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले असल्याची माहिती आहे.
सर्व शहरांना देशाशी जोडण्याच्या विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कमी दरात हवाई प्रवास करण्याची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. बिरसी विमानतळावरून सुरू होत असलेली विमान सेवा त्याचाच एक भाग आहे. खासदार झाल्यानंतर सुनील मेंढे यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि मंत्र्यांना भेटले. खासदारांनी प्रवासी वाहतूक सुरू होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या गेल्या, असं भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारमध्ये नागरी विमान मंत्री असताना गोंदियाच्या भविष्याचा विचार केला. बिरसी येथे असलेल्या इंग्रज काळातील विमानतळाला नवीन स्वरूप दिले. दिवसा तसेच रात्री विमाने उतरतील, अशी व्यवस्था केली. त्याच धावपट्टीवरून 13 मार्च रोजी विमान वाहतूक सेवा सुरू होत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे सरकार असताना या सेवेचे प्लानिंग केले होते. बिरसी येथील विमानतळाला अत्याधुनिक विमानतळाच्या दर्जा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानतळाची व्यवस्था केली. त्यामुळं ही विमानसेवा सुरू होत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या पत्रकात म्हटलं आहे.