तेजस मोहतुरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : दिवस बदलतं असतात. आम्ही सत्तेत कधी येऊ काही सांगता येत नाही, असं वक्तव्य काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भंडाऱ्यात होते. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचं जहाज बुडत आहे. त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्याच्या जहाजात जातील म्हणून अशी व्यक्तव्य केली जात आहेत. फडणवीस म्हणाले, मला वाटतं की, त्यांना ही भीती आहे. त्यांचे कार्यकर्ते जहाज बुडत आहे म्हणून दुसऱ्या जहाजात जातील. म्हणून कार्यकर्त्यांना दिलासा देण्याकरिता त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. असं वक्तव्य करत असतात, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
भाजपच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते, ते म्हणाले, अतिक्रमणं नियमित करायची आहे. ती टप्प्याटप्प्यानं होतील. प्रधानमंत्री आवास योजनेत 52 हजार घरांना सुरुवात झाली आहे. 42 हजार घरं झालेली आहेत. ड यादी तयार केली. अतिरिक्त घरकुल योजना लागू करण्यात येईल.
भंडारा हा मासेमारी करणारा जिल्हा आहे. बीजोत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीनं हे काम करायचं आहे. प्रशिक्षण, नवीन हॅटरीसाठी निधी देण्यात येईल. त्यामुळं 140 संस्थांचं बळकटीकरण होईल. कोलकाता, चेन्नई येथील मत्स्यबीज आणावं लागतं. जिल्हाधिकाऱ्यांना याचा आराखडा तयार करायला सांगितलं आहे.
कुसुम योजनेत दोन लाख सौर पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलर फिडर अशी योजना आणतो आहोत. दोन-तीन वर्षातलं टार्गेट ठरविलं आहे. कुठल्याही सरकारी विभागाची जागा जिल्हाधिकारी अलाट करू शकतात. ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारी जागा नसेल, तर शेतकऱ्याची जागा किरायानं घ्यायला तयार आहोत. 30 वर्षांसाठी आम्ही ती जागा किरायानं घेऊ म्हणजे मालकी त्यांचीच राहील. 15 दिवसांत त्याचाही जीआर काढू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.