तेजस मोहतुरे
भंडारा : कोणतेही खनिज उत्खनन करताना महसूल विभागाची (Revenue Department) परवानगी घ्यावी लागते. पण, मुरूम उत्खनन करून वाहतूक सुरू होती. मोहाडीच्या तहसीलदार दीपक कारंडे (Tehsildar Deepak Karande) यांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली. तीन टिप्पर व जेसीबी जप्त करण्यात आले. पाचगाव (डोकेपार रीठी) शिवारात (Pachgaon Shivara) अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. त्यावेळी तीन टिप्पर व एक जेसीबी उत्खनन करताना आढळले. हा मुरूम रेल्वेच्या नवीन ट्रॅकसाठी नेला जात होता. नवीन ट्रकसाठी हजारो ब्रास मुरूमची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामीण भागातून अवैध मुरूम काढला जात आहे.
या मुरूम उत्खननाने काही गावांतील शिवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खोल खड्ड्यात पाणी साचते. त्या ठिकाणी लहान मुलगा पडल्यास त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो. रेती किंवा मुरूम चोरी करताना अधिकार्यांवर नजर ठेवली जाते. त्यामुळं बरेचदा कारवाईसाठी गेलेल्या अधिकार्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागते. तहसीलदारांनी नवीन शक्कल लढवली. गुप्त पद्धतीने कारवाया सुरू केल्या. रेती, मुरुम चोरांना तहसील पथकाची लोकेशन मिळत नाही. त्यामुळं ते जाळ्यात अडकतात.
या कारवाईत कोथुर्णाचे विरेश बाबुराव लिचडे, दाभ्याचे मोनू सिद्धार्थ गणवीर, भंडाऱ्याचे अनिल ढेंगे यांचे टिप्पर जप्त करण्यात आले. भंडाऱ्याचे मनीष मेहर यांची जेसीबी जप्त करण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे इतर ठिकाणी मुरूम उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. कमी रॉयल्टीची मंजुरी घेऊन चारपट गौण खनिजांचे उत्खनन सुरू आहे. परंतु, आर्थिक व्यवहारामुळे अशा ठिकाणी कारवाई केली जात नसल्याचे समजते.